Monday, October 28, 2024

२१ व्या शतकासाठी २१ धडे - युवाल नोआ हरारी

मागच्या प्रत्येक शतकानुरूप माणसाने प्रगतीची द्वारे खुली केलेली आहेत. आपले जीवन सहज आणि सुकर होण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब केलेला आहे. तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे. त्याचा उपयोग आणि दुरुपयोग देखील केलेला आहे. परंतु आत्ताच्या अर्थात एकविसाव्या शतकामध्ये मनुष्य प्रगतीसाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा? या प्रश्नाचे उत्तर युवाल नोआ हरारी या पुस्तकातून देतात.

हरारी यांचे इतिहासावर टिप्पणी करणारे ‘सेपियन्स’ तर भविष्याचा वेध घेणारे ‘होमो डेअस’ हे पुस्तक यापूर्वी वाचले होते. परंतु २१व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक वर्तमानाचा आणि त्यातून भविष्याकडे जाण्याचा वेध घेणारे आहे. 

मानवी जीवनशैली सातत्याने बदलत चाललेली आहे. अर्थात यामध्ये पर्यावरण अथवा वातावरणाचा फारसा प्रभाव नाही. मानवच मानवी शैलीवर प्रामुख्याने प्रभाव टाकताना दिसतो. याच कारणास्तव होणारे सामाजिक बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. तरच मनुष्य म्हणून आपण या पृथ्वीवर टिकून राहू शकतो. असं म्हणतात की बदल ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी कधीही बदलत नाही! २१ व्या शतकामध्ये आपण कोणत्या गोष्टी निश्चितपणे ध्यानात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून मनुष्यप्राणी निदान हे शतक तरी तग धरून शकेल. याचा सारासार विचार हरारी यांनी या पुस्तकातून केल्याचा दिसतो.

पुस्तकाचे प्रामुख्याने पाच भाग आहेत. यातील पहिल्या भागात तंत्रज्ञानाचे आव्हान, दुसऱ्यामध्ये राजकीय आव्हान तिसऱ्यामध्ये आशा-निराशा, चौथ्या मध्ये सत्य आणि पाचव्यामध्ये लवचिकता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केल्याचा दिसतो. तंत्रज्ञानाचे आव्हान हे पहिल्याच भागामध्ये घेतल्याने त्याचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच मानवी जीवनशैली आणि सामाजिक रचना सातत्याने बदलत आहेत. या शतकात तिचा वेग वाढल्याचे दिसते. हरारी यांनी इतिहासातून बोध घेऊन पुढील वाटचालीतील धोके अतिशय सुयोग्य पद्धतीने नमूद केल्याचे दिसते. अर्थात ललित लेखन नसले तरी ही एक बोधकथा आहे. तंत्रज्ञान माणसाला रसातळाला कसे नेऊ शकते? हे आपल्याला समजते. परंतु याबरोबरच राष्ट्रवाद, धर्मांधता आणि स्थलांतर या गोष्टींवर देखील हरारी प्रकाश टाकतात. राष्ट्रे निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रवृत्ती वाढत गेल्या. धर्माने मानवी जीवनात कट्टरता आणली. आणि स्थलांतरांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. अर्थात या गोष्टी पुढे बदलत जाणार आहेत. त्या दृष्टीने सावध पावले कशी टाकावीत, याचे उत्तर देखील हरारी देतात.

दहशतवाद, युद्ध यावर त्यांनी परखड मते मांडलेली आहेत. दोन्हीही हिंसक गोष्टी तंत्रज्ञानाच्या तालावर जगात वेगाने पसरताना दिसतात. मानवी प्रगतीतील तो सर्वात मोठा अडथळा आहे. त्याच्या इतिहासातून बोध घेऊन आपल्याला कोणती पावले टाकता येतील, याचे उत्तरही देखील या पुस्तकातून मिळते.

पुस्तकाच्या चौथ्या भागात अर्थात ‘सत्य’मध्ये हरारी यांनी अज्ञान, न्याय, सत्योत्तर काळ आणि विज्ञानकथा या विषयांवर आपल्याशी चर्चा केल्याचे दिसते. मागच्या शेकडो वर्षांपासून यामध्ये सातत्याने बदल झालेला आहे. मागच्या शतकातील ज्ञान, न्याय, विज्ञान हे पूर्ण वेगळं होतं आणि एकविसाव्या शतकामध्ये ते अजून निराळे आहे. हा बदल कसा स्वीकारावा, याची चर्चा हरारी या पुस्तकामध्ये करतात.

अंतिम भागामध्ये अर्थात ‘लवचिकता’ या प्रभागात शिक्षण, आयुष्याचा अर्थ आणि ध्यानधारणा या तीन गोष्टींवर हरारी विश्लेषण करतात. जीवनाचा एक  मुख्य भाग म्हणून याकडे पाहता येईल. ज्याची प्रत्येक मनुष्यप्राण्याला नितांत आवश्यकता आहे. तात्विकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या जीवनात कशा पद्धतीने जमवून घ्यायला हव्यात अशा विविध प्रश्नांची उत्तरे हरारी या पुस्तकातून देतात. 

याही पुस्तकामध्ये असे अनेक विचार आहेत ते सुविचार म्हणून लिहून ठेवता येतील. परंतु पुस्तक वाचण्याच्या प्रवाहामध्ये त्याची परिणामकारकता अधिक जाणवते, हेही तितकेच खरे.



Thursday, October 24, 2024

रेवन रॉय - समर

मराठीमध्ये आजवर अनेक विज्ञानकथालेखकांनी वेगवेगळे प्रयोग केले. यातूनच विज्ञानातील विविध संकल्पना मराठी वाचकांना समजायला लागल्या. परंतु पॅरलल युनिव्हर्स अर्थात समांतर विश्व ही संकल्पना पहिल्यांदाच समर लिखित रेवन रॉय या कादंबरीतून मराठीमध्ये दिसून आली.
आपल्या विश्वाच्या समांतर देखील असेच आणखी एक विश्व आहे, ज्यात आपल्यासारखीच माणसे राहतात. बहुतांश वेळा ती आपल्याला स्वप्नातून देखील भेटतात, ही संकल्पना म्हणजे पॅरलल युनिव्हर्स होय. अर्थात याला पूर्ण वैज्ञानिक आधार नाही, परंतु सायन्स फिक्शनचा विचार केला तर यातून पाश्चिमात्य लेखकांनी बरंच लेखन केलेले आहे. तसं पाहिलं तर संकल्पना समजायला अवघडच. म्हणून कथा रूपात  आणण्यासाठी लेखकाचे लेखनकौशल्य देखील पणाला लागते. हे शिवधनुष्य उचलून लेखकाने रेवन रॉय या कादंबरीद्वारे चांगला प्रयत्न केला आहे.
रेवन रॉय नावाच्या निराशावादी मानसशास्त्रज्ञाची ही गोष्ट. त्याच्यासोबत त्याचे आणखी सात सहकारी आहेत. आपल्या विश्वाला संपवण्यासाठी तो सर्वदूर असलेले चैतन्य संपवायला सुरुवात करतो. यातूनच समांतर विश्वातील दुसरा रेवन रॉय देखील समोर येतो. अशी पार्श्वभूमी असणारी ही कथा. अनेकदा ती किचकट वाटते. शिवाय एक घटना आपल्या विश्वात तर दुसरी समांतर विश्वामध्ये घडते, तेव्हा वाचक काहीसा गोंधळून जातो. अर्थात यामध्ये वाचकाची एकाग्रता असणे अधिक महत्त्वाचे वाटते. कथेची मांडणी आणि वेग चांगला आहे. अर्थात तो अधिक उत्तम असू शकला असता. परंतु यानिमित्ताने का होईना समांतर विश्वाची गोष्ट मराठी वाचकांना समजेल, अशी आशा वाटते.


 

Wednesday, October 23, 2024

खेळ मांडला

मराठीमध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून शोकपटांची परंपरा आहे. अर्थात अशा चित्रपटांना प्रेक्षकवर्ग देखील चांगला लाभलेला दिसतो. “खेळ मांडला” हा चित्रपट देखील अशाच प्रकारचा.
बाहुल्यांचा खेळ करणारा दासू आपल्या वडिलांसह पोट भरण्यासाठी शहरामध्ये येतो. परंतु शहरात आल्यानंतर देखील त्याचा संघर्ष चालूच असतो. एके दिवशी अचानक अपघातामध्ये त्याचे वडील स्वर्गवासी होतात. अशातच त्या शहरामध्ये दंगल पेटते. त्याच दंगलीमध्ये त्याला एक तान्हे बाळ सापडते. तो त्या बाळाच्या माता पितांच्या शोधार्थ भटकत राहतो. परंतु त्याला त्याचे माता-पिता काही सापडत नाहीत. म्हणून तो त्या बाळाचा अर्थात छोट्या मुलीचा स्वतःच सांभाळ करायला लागतो. परंतु कालांतराने त्याला समजते की, ती मुलगी अंध आणि बहिरी देखील आहे आणि याच कारणास्तव तिला काही बोलता देखील येणार नाही. अशा मुलीचा सांभाळ करणे म्हणजे महाकठीण काम. परंतु हे शिवधनुष्य तो पेलतो. तिचे नामकरण ‘बाहुली’ असे करतो. आणि त्याच्या अन्य निर्जीव बाहूल्याप्रमाणे हिला देखील आपल्या खेळात सामील करून घेतो. हळूहळू ही सजीव बाहूली देखील निर्जीव बाहूल्याप्रमाणे खेळ खेळायला लागते. परंतु नियती मात्र त्याच्याशी वेगळाच खेळ खेळत असते. ही मुलगी नक्की कोणाची? तीला तीचे आई-वडील परत मिळतात का? आणि मिळाले तरी ती दासूला सोडते का? या प्रश्नांचे उत्तर हा चित्रपट उत्तरार्धात देतो.
सारांश सांगायचा तर शोकपटांच्या मालिकेतला हा दुःखातिवेग दर्शवणारा चित्रपट आहे. असे चित्रपट नियमित बघणाऱ्यांना तो आवडेलच. मंगेश देसाईने दासूच्या भूमिकेमध्ये आपले प्राण ओतल्याचे दिसते. परंतु केवळ मनोरंजन म्हणून चित्रपट पाहणाऱ्यांसाठी या चित्रपटात विशेष वाटणार नाही, हे नक्की.

--- तुषार भ. कुटे


 

झांबळ

‘घनदाट माणसांचं भाव विश्व उलगडणार्‍या कथा’ अशी टॅगलाईन असणारा “झांबळ” हे पुस्तक वाचायला सुरुवात केली.. पहिली कथा संपली आणि तिने मनात घर केले. मग काय लगेचच बाकीच्याही कथा वाचून काढल्या.

असं बऱ्याचदा होतं की कोणत्याही कथासंग्रहातील एखादी कथा वाचली की पुढच्याही कथा वाचाव्याशा वाटतात. खरंतर ही लेखकाच्या लेखनाची किमया आहे. आपल्या शब्दांनी तो वाचकाला खिळवून ठेवतो, प्रसंगांमध्ये गुंतवून ठेवतो. कथेतील प्रत्येक प्रसंग, घटना आपल्यासमोर उभी राहते. जणू काही ती आपल्यासमोरच किंवा आपल्या भोवतालीच घडत आहे, असं जाणवत राहतं. या पुस्तकाच्या बाबतीतही माझं असंच काहीतरी झालं.

या कथासंग्रहातील कथांना पूर्णतया ग्रामीण पार्श्वभूमी आहे. त्यातील प्रसंग गावच्या मातीत घडलेले आहेत. यात निरनिराळ्या प्रकारची माणसे आपल्याला भेटतात. त्यांच्या मानसिक भावभावनांचे दर्शन होते. गावाकडील मातीत जन्मलेल्या, रुजलेल्या आणि रुळलेल्या कोणालाही या कथा सहज भावतील. किंबहुना त्यातील अनेक प्रसंग त्यांनी अनुभवलेले देखील असतील. याच कारणास्तव त्या आपल्याला अधिक जवळच्या वाटतात. आपल्या भोवतालच्या अनेकविध माणसांचा आपण त्यांच्याशी संबंध जुळवू शकतो. बहुतांश कथा आपल्या काळजालाच हात घालतात. एकंदरीत लेखकाची लेखनशैली ही अतिशय उच्च दर्जाची जाणवते. यापूर्वी मला केवळ आनंद यादव, व्यंकटेश माडगूळकर आणि वि. वा. शिरवाडकर यांच्याच कथांमध्ये अशी शैली अनुभवता आली होती. समीर गायकवाड यांची शैली देखील याच पठडीतील आहे. कोणत्याही प्रसंगांचे किंवा व्यक्तीचे वर्णन करताना अतिशय सुयोग्य आणि चपखल शब्द ते वापरतात. जेणेकरून तो मनुष्य आपल्या डोळ्यासमोरच उभा राहतो. एकदा त्याची प्रतिमा तयार झाली की प्रसंग देखील आपल्या मनात तयार व्हायला लागतात.

यातील प्रत्येक कथेची एक कादंबरी होण्यासारखी आहे. अर्थात यात वेगाने घडणाऱ्या घटना आहेत, प्रसंग आहेत आणि आपल्याला मिळणारा बोध देखील आहे! एकाच पुस्तकामध्ये २२ कादंबऱ्या वाचण्याचा योग आपल्याला अनुभवता येतो! ‘हायवे’ ही कथा भयकथा या प्रकारात मोडू शकते. अन्य सर्व सामाजिक आणि ग्रामीण कथा आहेत. 

कथा संपते तेव्हा मनाला काहीशी हुरहुर देखील ती लावून जाते. यातच लेखकाच्या लेखणीचे आणि लेखनशैलीचे खरे यश आहे.



Tuesday, October 22, 2024

अतुल कहाते यांची मुलाखत

मराठी भाषेतून तंत्रज्ञान विषयावर लिहिणाऱ्या लेखकांपैकी एक नाव म्हणजे अतुल कहाते होय. त्यांनी जवळपास ७६ पुस्तके लिहिलेली आहेत. अशा बहुआयामी लेखकाची मुलाखत घेण्याचे काम बुकविश्वच्या टीमने माझ्यावर सोपवले होते. खरंतर हा माझा पहिलाच प्रयत्न होता. अर्थात यामुळे मनावर दडपण तर होतेच. परंतु, कहाते सरांची मागच्या दोन वर्षांपासून माझी ओळख होती. आमच्यामध्ये सातत्याने विचारांची देवाणघेवाण व्हायची. याच कारणास्तव मुलाखतीमध्ये मी त्यांच्याशी सहजपणे संवाद साधू शकलो. कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर सरांचे बहुमोल ज्ञान वाचकांना आणि श्रोत्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो, याचा आनंद आहे. 

AI चा इतिहास, त्याची प्रगती, त्याचा आवाका, त्याचे उपयोग, आव्हानं, संधी या सगळ्यांवर भाष्यं करुन लोकांना AI ची ओळख करुन अतुल कहाते यांनी या मुलाखतीतून करून दिली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधल्या एक्स्पर्ट सिस्टिम्स, रोबॉटिक्स, नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग, मशीन आणि डीप लर्निंग अशा अनेक तंत्रज्ञानाचा इतिहास, मूलतत्व, उपयोग आणि भविष्यवेध !  तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रमानव यांच्यातील परस्पर-संबंध, यंत्रमानवांनी भारलेल्या जगाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेचा विकास, कोणकोणत्या क्षेत्रांत यंत्रमानवरूपी क्रांती घडणार आहे, हॉलिवूड चित्रपटांमधील यंत्रमानवांचा वावर, विज्ञानकथांनी केलेली यंत्रमानवी संस्कृतीची भाकिते, इ. चा वस्तुनिष्ठ आणि रंजक पद्धतीने वेध कहाते सरांनी या मुलाखतीतून घेतला आहे. 


नक्की ऐका आणि बुकविश्वला सबस्क्राईब करा: https://youtu.be/uRUVSi14Ysg


#interview #atulkahate #artificialintelligence #marathi #technology #machinelearning #bookvishwa

 


 


Saturday, October 19, 2024

बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या डॉ. मारिया मॉन्टेसरी

मानवी प्रगतीसाठी अत्यावश्यक असलेल्या मूलभूत घटक म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाने माणूस शहाणा बनतो, प्रगल्भ होतो. म्हणून सुयोग्य शिक्षण घेणे हा मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या इतिहासामध्ये आजवर अनेक शिक्षणातज्ञांनी शिकवण्यासाठी नवनवीन पद्धती विकसित केल्या. वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे बालशिक्षणाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप नवनवे बदल होत गेले, नवीन विचार आत्मसात होत गेले आणि त्यातूनच मानवी प्रगतीची द्वारे उघडत गेली. अशाच शिक्षण पद्धतीच्या विकासामध्ये अर्ध्वयू असणारे नाव म्हणजे ‘मारिया मॉन्टेसरी’ होय.
आजकाल सर्वत्र माजलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या स्तोमामध्ये मॉन्टेसरी पद्धतीच्या शाळा देखील वाढलेल्या दिसतात. याच मॉन्टेसरी पद्धतीच्या प्रणेत्या म्हणजे डॉ. मारिया मॉन्टेसरी होय. मागच्या शतकामध्ये त्यांनी शिक्षणाच्या एका नव्या पद्धतीचा पाया रचला. माणसाच्या शिक्षणाची सुरुवात जिथून होते त्या बालशिक्षणात नव्या संकल्पनांचा अंतर्भाव मॉन्टेसरी यांनी केला. याच मारीया मॉन्टेसरी यांची गोष्ट सांगणारे हे पुस्तक ‘बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या डॉ. मारिया मॉन्टेसरी’.
भारताप्रमाणेच युरोपातीलही बहुतांश देशांमध्ये शतकभरापूर्वी शिक्षणाची आणि विशेषत: महिला शिक्षणाची परिस्थिती फारशी बरी नव्हती. एक विशिष्ट साचेबद्ध शिक्षण मुलांना दिले जायचे. यात मुलांच्या आवडीचा त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यास प्राथमिकता नव्हती. परंतु मॉन्टेसरी यांनी आपल्या अनुभवातून शिक्षणाचा नवा विचार रुजवला. शिकणे म्हणजे काय हे मारिया मॉन्टेसरी यांना व्यवस्थित समजले होते.  जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असते तेव्हा आपल्या मेंदूचा, क्रियांचा सुयोग्य वापर केला गेला पाहिजे.  याच दृष्टिकोनातून त्यांनी मॉन्टेसरी शिक्षण पद्धत विकसित केली.
मॉन्टेसरी या मूळच्या इटली मधल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अनुभवातून नवी साधने निर्माण केली. आणि यातूनच बालशिक्षण देण्यासाठी नवी पद्धती नावारूपास आणली. हळूहळू तिची उपयुक्तता लक्षात आल्याने इटलीबाहेर देखील तिचा प्रसार व्हायला लागला. संपूर्ण युरोपातून मॉन्टेसरी यांची मागणी वाढली. आणि लवकरच अमेरिकेसारख्या प्रगत देशात देखील मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा शिरकाव झाला. बहुतांश शाळांनी या पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली. मॉन्टेसरी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना त्या स्वतः प्रशिक्षित करत असत. म्हणूनच त्यांचे जगभरात बहुतांश देशांमध्ये दौरे देखील झाले. विशेष म्हणजे भारताला देखील त्यांचा नऊ-दहा वर्षांचा सहवास लाभलेला आहे. या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्यांचे वास्तव्य होते. कोल्हापुरात त्यांनी मॉन्टेसरी पद्धतीची शाळा सुरू केली होती जी आजतागायत चालू आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांचे तीन वेळात नोबेल साठी नामांकन देखील झाले होते. त्यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा हा गौरवच मानायला हवा.
आज भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये चाललेला खेळखंडोबा पाहता शिक्षण हे शिक्षण न राहता फक्त आणि फक्त पैसा कमविण्याचे मोठे साधन बनलेले आहे. आपण खरोखर शिक्षणापासून दूर जात आहोत. केवळ मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी शिक्षण घेतले जाते. अर्थात बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हाच असतो. परंतु प्रयोग, ज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाचा पाया ज्या मॉन्टेसरींनी रचला त्या अजूनही अनेकांना समजलेल्या नाहीत. कदाचित या पुस्तकाचा त्यांना उपयोग होऊ शकेल.

--- तुषार भ. कुटे.


 

Thursday, October 17, 2024

अक्षरबाग

१९९९ ते २००० च्या दरम्यान सर्वप्रथम हे पुस्तक मी पाहिले होते. कदाचित याच काळात या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली असावी. हे पुस्तक विशेष याकरिता वाटले की, त्यातील कविता प्रत्यक्ष कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या होत्या! कुसुमाग्रजांसारख्या ज्येष्ठ कवींनी बालकवितांचे हे पुस्तक लिहिल्याचे बघून माझी उत्सुकता चाळवली गेली. आणि त्यातील सर्व बालकविता मी वाचून काढल्या.
“एका मुळाक्षराची एक बालकविता” या संकल्पनेतून ही ‘अक्षरबाग’ साकारलेली आहे. म्हणजेच प्रत्येक कवितेमध्ये सदर अक्षर अधिकाधिक वेळा आल्याचे दिसते. किती सुंदर संकल्पना आहे ही! आणि त्याहीपेक्षा कवीसाठी एक आव्हानात्मक काम देखील! परंतु कुसुमाग्रजांनी ते लीलया पेलले आणि मराठी मुळाक्षरानुसार सहज आणि सोप्या बालकविता या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केल्या. त्या वाचायला घेतल्या की आपण नकळतपणे चालीमध्ये गायला लागतो. अतिशय कमी जोडाक्षरे असणाऱ्या या बालकविता मुलं देखील सहजपणे वाचू आणि गाऊ देखील शकतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या मुलीने देखील यातील काही कविता गायल्या होत्या.
भाषेचे सौंदर्य हे कवितांमध्ये असते. त्यातील ताल आणि लय हे शब्दांद्वारे भाषेची ओळख करून देतात. जर बालपणीच अशा पुस्तकांची मुलांना ओळख झाली तर निश्चितच त्यांची भाषेची अधिक जवळीक अधिक वाढू शकेल.

--- तुषार भ. कुटे


 

Wednesday, October 16, 2024

वाचन प्रेरणा दिवस 2024

सन २०१५ पासून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्रामध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरी केली जाते. पहिल्याच वर्षापासून आम्ही देखील हा दिवस विविध शाळांमध्ये पुस्तक वाचन आणि वाटपाच्या कार्यक्रमाने साजरा करत आलो आहोत. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक मराठी शाळांमध्ये जाऊन आम्ही विविध विषयांवरील पुस्तकांचे वितरण करतो. बालवयातच मुलांना शाळेमध्ये सहज पुस्तके उपलब्ध व्हावी आणि अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून आम्ही विविध बालसाहित्य शाळांना देत असतो.

यावर्षी पुण्यापासून शंभरपेक्षा अधिक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निगडाळे गावातील दोन शाळांची आम्ही निवड केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत आणि भीमाशंकराच्या अभयारण्यात वसलेले निगडाळे हे गाव होय. अतिदुर्गम भागात असल्याने येथे सुखसोयी अन सुविधांची वानवाच आहे. शाळांचा पटदेखील फार मोठा नाही. परंतु मुलांचा उत्साह आणि शिकण्याची इच्छा मात्र वाखाणण्याजोगी आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसाळी प्रदेशात हा भाग येतो. म्हणूनच शाळेची इमारत देखील पावसाच्या पाऊल खुणा झेलत उभी असल्याची दिसली. पावसाचे चारही महिने धुक्यामध्ये असणारा हा परिसर. अशा खडतर परिस्थितीमध्ये इथली मुले शिक्षण घेत आहेत. आज पुस्तके वाटपाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. पुण्यावरून कोणीतरी पाहुणे आपल्याला पुस्तके भेट देण्यासाठी आलेली आहेत, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पुस्तके वाटप झाल्यानंतर लगेचच ती वाचण्याची लगबग भारावून टाकणारी होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग्य शाळेच्या आणि मुलांच्या हातात वाचन संस्कृतीची आयुधे देत आहोत, याचे समाधान वाटले.

या शाळांतील शिक्षकांचे देखील कौतुक करावे तितके कमीच आहे. रोजचा जवळपास सत्तर किलोमीटरचा प्रवास करत ते शाळेमध्ये येतात. मुलांना शिक्षणाचे धडे गिरवायला शिकवतात. त्यांनी केलेली शाळेची सजावट देखील कौतुकास्पद होती. त्यांनी शाळेसाठी विविध सामाजिक संस्थांकडून अनेक उपकरणे देखील प्राप्त केलेली होती. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी ते उत्तमरीत्या करतात, हे देखील प्रशंसनीय होते. 

 

 





Tuesday, October 15, 2024

वाचनवेडी ज्ञानू

जवळपास दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीला कांजण्या झाल्या होत्या म्हणून आम्ही तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासून निदान केले, औषधे दिली आणि तिला सांगितले, 'आता आठवडाभर आराम करायचा आणि छान टीव्ही बघत बसायचं'. यावर तिने डॉक्टरांना सांगितले की, 'आमच्याकडे टीव्ही नाही मी पुस्तके वाचत असते'. तिच्या बोलण्याने डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कदाचित त्यांना आजवर असं कोणीही भेटलं नसेल की ज्याच्या घरी टीव्ही नाही आणि घरातील लहान मुल पुस्तके वाचत असते. डॉक्टरांनी देखील शाबासकीची थाप ज्ञानेश्वरीला दिली.
ती दोन वर्षाची असल्यापासून तिची आई तिला विविध पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवायची. तेव्हाच तिला बऱ्याच गोष्टी पाठ झाल्या होत्या. तीला जेव्हापासून अक्षर ओळख झाली तेव्हापासूनच हळूहळू वाचायची गोडी वाढत गेली. घराच्या भिंती पुस्तकांनी भरलेल्या होत्या. शिवाय तिच्या आईला आणि मलाही वाचनाची आवड असल्याने तिच्या आजूबाजूला तसं वातावरण तयार होत होतं. आई-बाबा बहुतांश वेळा वाचताना दिसायचे. त्यामुळे तिला देखील पुस्तके वाचनाची गोडी लागत गेली. शिवाय मातृभाषेतूनच शिकत असल्याने तिला अजूनच सोपे झाले. मग आम्ही देखील तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करू लागलो. तिला पुस्तकांच्या दुकानात घेऊन जाऊ लागलो. पुस्तक प्रदर्शनामध्ये बालसाहित्य दाखवू लागलो. ती देखील मनसोक्तपणे पुस्तकांची खरेदी करत होती आणि सर्व पुस्तके वाचून काढत होती. आज आमच्या पुस्तकांच्या कपाटामध्ये तिची देखील शंभरहून अधिक पुस्तके आहेत. तिच्या कपड्यांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक खरेदी ही पुस्तकांची होते!
घरामध्ये टीव्ही नसल्याचा हा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. विरंगुळा म्हणून ती पुस्तके वाचू लागली. तिला कधीकधी काही शब्द समजायचे नाहीत. मग ती आम्हाला विचारायची. यातून तिचा शब्दसंग्रह देखील वाढत गेला. आजही ती कधीकधी असे विशिष्ट शब्द वाक्यांमध्ये प्रयोग करून आमच्याशी बोलत असते. अनेकदा तिची वाक्यरचना ऐकून त्रयस्थ व्यक्ती देखील आश्चर्यचकित होते. ही सर्व वाचनाची किमया आहे. अनेकांना असंही वाटतं की, या मुलीला किती अभ्यास असतो. ती सदानकदा अभ्यासच करत असते. आजकाल कोणतीच मुले अवांतर वाचत नसल्याने बहुतांश जणांचा हा भ्रम होणं साहजिकच आहे!
बाहेर कुठेही फिरायला गेलो तरी तिच्या पिशवीमध्ये तीन-चार पुस्तके असतातच. प्रवासात गाडीमध्ये देखील ती पुस्तके वाचत बसते. रोज रात्री झोपताना पुस्तक वाचन करणे, हाच तिचा सर्वात मोठा छंद आहे. आम्ही दोघेही वाचत असलो की ती देखील आमच्यामध्ये सामील होते. कोणते पुस्तक वाचले आहे, कोणते वाचले नाही, तसेच कोणत्या पुस्तकात कोणती गोष्ट आहे, हे देखील तिच्या व्यवस्थित ध्यानात आहे.
यावर्षीपासून तर ती पुस्तकांवरचा आपला अभिप्राय देखील द्यायला लागली आहे. तिची सर्जनशीलता विकसित व्हायला लागली आहे. अर्थात वाचनामुळेच ती आता स्वतः स्वतःच्या मनाने लिहू देखील लागली आहे! मागच्या काही महिन्यात तिने स्वरचित कविता देखील केल्या आहेत. स्वतःच्या कथा कवितांचे पुस्तक तिच्या आईने प्रकाशित करावे, अशी देखील तिची मनोकामना आहे. तिच्या वाचन वेडाचीच ही परिणीती आहे असे आम्हाला वाटते.
मागच्या नऊ वर्षांपासून आम्ही वाचन प्रेरणा दिनी विविध शाळांमध्ये पुस्तके वाटपाचा कार्यक्रम करतो. ज्ञानेश्वरी एक वर्षाची असल्यापासून तिला देखील आम्ही या कार्यक्रमांमध्ये नेत असतो. यातून तिला पुस्तकांचे वाचनाचे महत्त्व समजते. त्यातूनच विचारांची आणि मनाची समृद्धी देखील येते. याची जाणीव तिला हळूहळू होऊ लागली आहे.
आजच्या वाचन प्रेरणा दिनी तिच्या वाचनवेडाची ओळख व्हावी आणि इतरांनाही प्रेरणा मिळावी...  हाच या पोस्टचा मुख्य उद्देश.
















 

Monday, October 14, 2024

रवी आमले यांची मुलाखत

ज्येष्ठ मराठी लेखक, पत्रकार व संपादक श्री. रवी आमले यांची “रॉ - भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा”, “प्रोपगंडा” आणि “परकीय हात” ही पुस्तके प्रामुख्याने सर्वांना सुपरिचित आहेत. ही पुस्तके  वाचताना त्यांचा या विषयांवरील सखोल अभ्यास ध्यानात येतो. ‘बुकविश्व’च्या युट्युब पॉडकास्टच्या निमित्ताने त्यांची पुनश्च एकदा ‘बुकविश्व’च्या स्टुडिओमध्ये भेट झाली. मराठी लेखक श्री. चेतन कोळी यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. ही आम्ही लाईव्ह बघितली. भारताची गुप्तचर संस्था “रॉ” याविषयी ते भरभरून बोलले, सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेली गुपिते देखील त्यांनी उघड केली, हेरांच्या कहाण्या सांगितल्या….. सर्व काही अद्भुत होतं. यातून लेखकाला पुस्तक लिहिण्यासाठी किती सखोल अभ्यास करावा लागतो, हे देखील ध्यानात आले. त्यांची पुस्तके म्हणजे गुप्तहेरांसाठी संदर्भग्रंथ ठरावी अशीच आहेत.

बुकविश्वच्या या मुलाखतीतून भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता अखंड राखण्याचे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिका-यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्या मोहिमांच्या या कथा आपणांस भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे दर्शन रवी आमले घडवतात...

ही मुलाखत पहायला आणि बुकविश्वच्या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका :


लिंक: https://youtu.be/D7s2gfZXU20

 


 



Friday, October 11, 2024

फुलवंती

पेशवेकाळातील एका लग्नाच्या बोलणीतील दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. वर पक्षाला हुंड्यामध्ये काहीही नकोय. पण अखंड हिंदुस्तानात गाजत असलेल्या फुलवंतीचा कलाविष्कार आपल्या इथे व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. मग शोध सुरू होतो फुलवंतीचा. अगदी दिल्लीच्या दरबारालाही वाट पाहायला लावणारी फुलवंती आपला नृत्याविष्कार इतक्या कलात्मकतेने सादर करते की बघणाऱ्यांच्या डोळ्याच्या पापण्याही लवत नाहीत. पूर्ण हिंदुस्थानामध्ये ती एकमेवाद्वितीय अशी नृत्यांगना आहे, जीला कुणाचीच तोड नाही.
अखेरीस पुण्याचे नाव ऐकल्याने ती पेशव्यांच्या पुण्यामध्ये यायला तयार होते. अर्थात ज्या मस्तानीच्या पायाची धूळ शनिवार वाड्याला लागलेली आहे, तिथेच तिला देखील आपले नृत्य सादर करायचे असते. इथून कथेची खरी सुरुवात होते. फुलवंती पुण्यामध्ये पोहोचते. पोहोचण्यापूर्वीच तिची पेशवे दरबारातील प्रकांड पंडित आणि धर्मशास्त्राचे सखोल ज्ञान असणाऱ्या वेंकटधारी नरसिंहशास्त्री यांच्याशी गाठ पडते. कदाचित पहिल्याच दृष्टीमध्ये ती नकळतपणे त्यांच्याकडे आकर्षित देखील होते. शनिवारवाड्यामध्ये नृत्य सादर करत असताना याच शास्त्रींकडून फुलवंतीचा अपमान केला जातो आणि सुरू होतो श्रेष्ठत्वाचा आणि अहंकाराचा खेळ. एका बाजूला धर्मशास्त्राचे महापंडित तर दुसऱ्या बाजूला जिला कोणीही हरवू शकत नाही, तिच्या कलेमध्ये उणीवही काढू शकत नाही, अशी फुलवंती. दोघेही एकमेकांचे आव्हान स्वीकारतात. दोघांपैकी कोण श्रेष्ठ? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या उत्तरार्धात सापडते.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट. महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून रचलेली ही एक कथा आहे. प्रेम, त्याग, अहंकार, गर्व, अशा विविध भावनांचे चित्रण या कथेतून समोर येते. आणि अंतिमतः एक विलक्षण कहानी अनुभवल्याची भावना रसिकांना मिळते. हेच या चित्रपटाचे यश आहे. स्नेहल तरडे यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच अनुभव यशस्वी झाल्याचे दिसते. एकंदर चित्रपट पाहताना दिग्दर्शक नवखा आहे, असे कुठेही भासत नाही. अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमी असलेला भव्यदिव्यपणा या चित्रपटात ठासून भरलेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिमता जाणवत नाही. प्राजक्ता माळीचे काम तर उत्कृष्टच. या चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तीच मराठीतील सर्वश्रेष्ठ नृत्यांगना आहे. बऱ्याचदा असे देखील जाणवतं की फुलवंतीची भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी. अर्थात तिला फुलवंती अगदी अचूक समजल्याचे दिसते.  
शीर्षक गीत ‘फुलवंती’ आणि ‘मदनमंजिरी’ या दोन्ही गाण्यांमध्ये तिने जीव ओतून कला सादर केल्याचे दिसते. कदाचित तिचा आजवरचा हा सर्वोत्तम चित्रपट असावा. तिच्या व्यतिरिक्त गश्मीर महाजनी, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, चिन्मयी सुमित या सर्वांचीच कामे उत्कृष्ट झालेली आहेत. खरं सांगायचं तर दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी लक्ष्मीबाईंची भूमिका दुसऱ्या कोणत्यातरी अभिनेत्रीला द्यायला हवी होती. त्यांच्या भूमिकेमध्ये नैसर्गिकता जाणवत नाही. शिवाय पेशव्यांच्या भूमिकेत क्षितिज दाते फारसा उठून दिसत नाही. कथा अतिशय सूत्रबद्धतेने पडद्यावर साकारलेली दिसते. यावर्षीच्या चित्रपटांपैकी एक उत्तम चित्रपट आहे, असे ‘फुलवंती’ला म्हणता येईल.
चित्रपटातील तीनही गाणी लक्षात राहतात आणि गुणगुणावीशी वाटतात. नृत्यदिग्दर्शकाची कमाल पडद्यावर पाहायला मजा येते. हास्यजत्रेतले ‘सहा पुणेकर’ पडद्यावर गंभीर भूमिकेत असले तरी त्यांना पाहिल्यावर चेहऱ्यावर नकळत स्मित हास्य उमटते.
एकंदरीत पहिल्या दृश्यापासूनच चित्रपट खिळवून ठेवतो. कदाचित एकापेक्षा अधिक वेळा देखील आपण तो निश्चित पाहू शकतो. असा उत्तम चित्रपट नक्कीच चुकवू नका.

— तुषार भ. कुटे. 




Thursday, October 3, 2024

मी साउथ इंडियन?

पूर्ण भारतभरातून विविध प्रशिक्षणार्थी माझ्या एका प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. तीन आठवड्यांच्या या कार्यक्रमात ती पहिला आठवडा संपला. बहुतांश विद्यार्थी आजवर झालेल्या एकंदरीत प्रशिक्षणावर चांगलेच खुश होते. पहिल्या दिवशी माझ्याशी बोलायला घाबरणारे काही विद्यार्थी आता धीटपणे बोलत होते आणि प्रश्नही विचारत होते. अशातीलच एक जण त्या दिवशी मला येऊन भेटला. त्याने इंग्रजीतून विचारले,
“सर तुम्ही साउथ इंडियन आहात का?”
मी त्याला स्मितहास्य करत उत्तर दिले,” नाही मी पुण्याचाच आहे!”
मला त्याच्या या प्रश्नामागचे गमक लक्षात आले. मागच्या आठवडाभरात मी एकदाही हिंदी भाषेचा कुठेही वापर केला नव्हता. पूर्ण प्रशिक्षण शंभर टक्के इंग्रजीमध्ये पार पडले होते. प्रत्येक मुलाला त्यांच्या भाषेतील प्रश्नाला इंग्रजीमध्ये तर्कशुद्ध उत्तरे दिली होती. कदाचित याचमुळे त्याला मी साउथ इंडियन आहे का, हा प्रश्न पडला असावा.
खरंतर केवळ उत्तर भारतीय लोकच स्वतःची भाषा भारतभरात मुक्तपणे वापरतात. आणि महाराष्ट्रात मात्र आपली मराठी सोडून ही भाषा सहजपणे स्वीकारणारे करोडो लोक अस्तित्वात आहेत. याउलट दक्षिण भारतीय त्यांची भाषा आणि इंग्रजी यांचाच प्रामुख्याने वापर करतात. इतरांकडे ते ढुंकूनही पाहत नाहीत. कदाचित याच कारणास्तव त्यांच्या ज्ञानाची पातळी इतरांपेक्षा बऱ्यापैकी वरचढ आहे. ते सुशिक्षित देखील आहेत. ही गोष्ट आपल्या लोकांना कधी समजणार देव जाणे. 

 --- तुषार भ. कुटे

मदनमंजिरी

प्राजक्ता माळी अभिनित 'फुलवंती' चित्रपटाचा ट्रेलर मागच्या आठवड्यामध्ये प्रदर्शित झाला आणि तो वेगाने समाजमाध्यमांवर सामायिक होऊ लागला. या चित्रपटातील गाणी देखील सर्वत्र बघायला मिळत आहेत. स्वतः प्राजक्ताने ही गाणी रील स्वरूपात तिच्या सोशल अकाउंट्सवर सामायिक केलेली आहेत. या गाण्यांमधील प्रामुख्याने "मदनमंजिरी" ही लावणी मराठी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे दिसते.  
लावणी हा मराठी नृत्य प्रकारांतील अविभाज्य घटक आहे. कित्येक दशकांपासून मराठी चित्रपटांमध्ये लावणी पाहण्यात येते. अगदी अलीकडच्या काळात देखील अनेक चित्रपटांमध्ये मराठी सिनेतारकांनी उत्तम उत्तम मराठी लावण्या सादर केल्या होत्या. परंतु फुलवंती चित्रपटातील प्राजक्ताची ही लावणी बघितली तर या नृत्यप्रकारास तिने अतिशय बारकाव्याने सादर केल्याचे दिसते. आधुनिक काळातील लावण्या ह्या काही कलाकारांमुळे अश्लीलतेकडे झुकत असल्याच्या दिसून येतात. परंतु मराठी भाषा आणि संस्कृतीची उत्तम जाण असलेल्या प्राजक्ताने या लावणी मध्ये आपला जीव ओतल्याचे दिसते. लावणीतील आपल्या कलेच्या बाबतीत ती 'परफेक्ट' असल्याचेच यातून दिसून येते. तिच्या व्हिडिओजवर रसिकांच्या पडत असलेल्या कमेंट्स वाचून आजही मराठी लोक उत्तम कला प्रकाराला उस्फूर्त दात देतात, हेही दिसते. अशाच कलाकारांमुळेमुळे मराठी संस्कृतीतील कला जिवंत आहेत. किंबहुना याही पुढे त्या अशाच बहरत राहतील.
युट्युबवर संगीत कंपनीच्या अधिकृत खात्यावर सदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एकदा अवश्य बघा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

https://www.youtube.com/watch?v=oEmD35XlsKU