मागच्या प्रत्येक शतकानुरूप माणसाने प्रगतीची द्वारे खुली केलेली आहेत. आपले जीवन सहज आणि सुकर होण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब केलेला आहे. तंत्रज्ञानाचा विकास केलेला आहे. त्याचा उपयोग आणि दुरुपयोग देखील केलेला आहे. परंतु आत्ताच्या अर्थात एकविसाव्या शतकामध्ये मनुष्य प्रगतीसाठी कोणत्या गोष्टींचा अवलंब करावा? या प्रश्नाचे उत्तर युवाल नोआ हरारी या पुस्तकातून देतात.
हरारी यांचे इतिहासावर टिप्पणी करणारे ‘सेपियन्स’ तर भविष्याचा वेध घेणारे ‘होमो डेअस’ हे पुस्तक यापूर्वी वाचले होते. परंतु २१व्या शतकासाठी २१ धडे हे पुस्तक वर्तमानाचा आणि त्यातून भविष्याकडे जाण्याचा वेध घेणारे आहे.
मानवी जीवनशैली सातत्याने बदलत चाललेली आहे. अर्थात यामध्ये पर्यावरण अथवा वातावरणाचा फारसा प्रभाव नाही. मानवच मानवी शैलीवर प्रामुख्याने प्रभाव टाकताना दिसतो. याच कारणास्तव होणारे सामाजिक बदल आपल्याला स्वीकारावे लागतात. तरच मनुष्य म्हणून आपण या पृथ्वीवर टिकून राहू शकतो. असं म्हणतात की बदल ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी कधीही बदलत नाही! २१ व्या शतकामध्ये आपण कोणत्या गोष्टी निश्चितपणे ध्यानात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून मनुष्यप्राणी निदान हे शतक तरी तग धरून शकेल. याचा सारासार विचार हरारी यांनी या पुस्तकातून केल्याचा दिसतो.
पुस्तकाचे प्रामुख्याने पाच भाग आहेत. यातील पहिल्या भागात तंत्रज्ञानाचे आव्हान, दुसऱ्यामध्ये राजकीय आव्हान तिसऱ्यामध्ये आशा-निराशा, चौथ्या मध्ये सत्य आणि पाचव्यामध्ये लवचिकता या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केल्याचा दिसतो. तंत्रज्ञानाचे आव्हान हे पहिल्याच भागामध्ये घेतल्याने त्याचे महत्त्व प्रामुख्याने अधोरेखित होते. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच मानवी जीवनशैली आणि सामाजिक रचना सातत्याने बदलत आहेत. या शतकात तिचा वेग वाढल्याचे दिसते. हरारी यांनी इतिहासातून बोध घेऊन पुढील वाटचालीतील धोके अतिशय सुयोग्य पद्धतीने नमूद केल्याचे दिसते. अर्थात ललित लेखन नसले तरी ही एक बोधकथा आहे. तंत्रज्ञान माणसाला रसातळाला कसे नेऊ शकते? हे आपल्याला समजते. परंतु याबरोबरच राष्ट्रवाद, धर्मांधता आणि स्थलांतर या गोष्टींवर देखील हरारी प्रकाश टाकतात. राष्ट्रे निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादी प्रवृत्ती वाढत गेल्या. धर्माने मानवी जीवनात कट्टरता आणली. आणि स्थलांतरांमुळे स्थानिकांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली. अर्थात या गोष्टी पुढे बदलत जाणार आहेत. त्या दृष्टीने सावध पावले कशी टाकावीत, याचे उत्तर देखील हरारी देतात.
दहशतवाद, युद्ध यावर त्यांनी परखड मते मांडलेली आहेत. दोन्हीही हिंसक गोष्टी तंत्रज्ञानाच्या तालावर जगात वेगाने पसरताना दिसतात. मानवी प्रगतीतील तो सर्वात मोठा अडथळा आहे. त्याच्या इतिहासातून बोध घेऊन आपल्याला कोणती पावले टाकता येतील, याचे उत्तरही देखील या पुस्तकातून मिळते.
पुस्तकाच्या चौथ्या भागात अर्थात ‘सत्य’मध्ये हरारी यांनी अज्ञान, न्याय, सत्योत्तर काळ आणि विज्ञानकथा या विषयांवर आपल्याशी चर्चा केल्याचे दिसते. मागच्या शेकडो वर्षांपासून यामध्ये सातत्याने बदल झालेला आहे. मागच्या शतकातील ज्ञान, न्याय, विज्ञान हे पूर्ण वेगळं होतं आणि एकविसाव्या शतकामध्ये ते अजून निराळे आहे. हा बदल कसा स्वीकारावा, याची चर्चा हरारी या पुस्तकामध्ये करतात.
अंतिम भागामध्ये अर्थात ‘लवचिकता’ या प्रभागात शिक्षण, आयुष्याचा अर्थ आणि ध्यानधारणा या तीन गोष्टींवर हरारी विश्लेषण करतात. जीवनाचा एक मुख्य भाग म्हणून याकडे पाहता येईल. ज्याची प्रत्येक मनुष्यप्राण्याला नितांत आवश्यकता आहे. तात्विकदृष्ट्या महत्त्वाच्या गोष्टी आपण आपल्या जीवनात कशा पद्धतीने जमवून घ्यायला हव्यात अशा विविध प्रश्नांची उत्तरे हरारी या पुस्तकातून देतात.
याही पुस्तकामध्ये असे अनेक विचार आहेत ते सुविचार म्हणून लिहून ठेवता येतील. परंतु पुस्तक वाचण्याच्या प्रवाहामध्ये त्याची परिणामकारकता अधिक जाणवते, हेही तितकेच खरे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com