Tuesday, October 15, 2024

वाचनवेडी ज्ञानू

जवळपास दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ज्ञानेश्वरीला कांजण्या झाल्या होत्या म्हणून आम्ही तिला घेऊन डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी तपासून निदान केले, औषधे दिली आणि तिला सांगितले, 'आता आठवडाभर आराम करायचा आणि छान टीव्ही बघत बसायचं'. यावर तिने डॉक्टरांना सांगितले की, 'आमच्याकडे टीव्ही नाही मी पुस्तके वाचत असते'. तिच्या बोलण्याने डॉक्टर आश्चर्यचकित झाले. कदाचित त्यांना आजवर असं कोणीही भेटलं नसेल की ज्याच्या घरी टीव्ही नाही आणि घरातील लहान मुल पुस्तके वाचत असते. डॉक्टरांनी देखील शाबासकीची थाप ज्ञानेश्वरीला दिली.
ती दोन वर्षाची असल्यापासून तिची आई तिला विविध पुस्तकांमधील गोष्टी वाचून दाखवायची. तेव्हाच तिला बऱ्याच गोष्टी पाठ झाल्या होत्या. तीला जेव्हापासून अक्षर ओळख झाली तेव्हापासूनच हळूहळू वाचायची गोडी वाढत गेली. घराच्या भिंती पुस्तकांनी भरलेल्या होत्या. शिवाय तिच्या आईला आणि मलाही वाचनाची आवड असल्याने तिच्या आजूबाजूला तसं वातावरण तयार होत होतं. आई-बाबा बहुतांश वेळा वाचताना दिसायचे. त्यामुळे तिला देखील पुस्तके वाचनाची गोडी लागत गेली. शिवाय मातृभाषेतूनच शिकत असल्याने तिला अजूनच सोपे झाले. मग आम्ही देखील तिच्यासाठी पुस्तकांची खरेदी करू लागलो. तिला पुस्तकांच्या दुकानात घेऊन जाऊ लागलो. पुस्तक प्रदर्शनामध्ये बालसाहित्य दाखवू लागलो. ती देखील मनसोक्तपणे पुस्तकांची खरेदी करत होती आणि सर्व पुस्तके वाचून काढत होती. आज आमच्या पुस्तकांच्या कपाटामध्ये तिची देखील शंभरहून अधिक पुस्तके आहेत. तिच्या कपड्यांइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक खरेदी ही पुस्तकांची होते!
घरामध्ये टीव्ही नसल्याचा हा खूप मोठा फायदा आम्हाला झाला. विरंगुळा म्हणून ती पुस्तके वाचू लागली. तिला कधीकधी काही शब्द समजायचे नाहीत. मग ती आम्हाला विचारायची. यातून तिचा शब्दसंग्रह देखील वाढत गेला. आजही ती कधीकधी असे विशिष्ट शब्द वाक्यांमध्ये प्रयोग करून आमच्याशी बोलत असते. अनेकदा तिची वाक्यरचना ऐकून त्रयस्थ व्यक्ती देखील आश्चर्यचकित होते. ही सर्व वाचनाची किमया आहे. अनेकांना असंही वाटतं की, या मुलीला किती अभ्यास असतो. ती सदानकदा अभ्यासच करत असते. आजकाल कोणतीच मुले अवांतर वाचत नसल्याने बहुतांश जणांचा हा भ्रम होणं साहजिकच आहे!
बाहेर कुठेही फिरायला गेलो तरी तिच्या पिशवीमध्ये तीन-चार पुस्तके असतातच. प्रवासात गाडीमध्ये देखील ती पुस्तके वाचत बसते. रोज रात्री झोपताना पुस्तक वाचन करणे, हाच तिचा सर्वात मोठा छंद आहे. आम्ही दोघेही वाचत असलो की ती देखील आमच्यामध्ये सामील होते. कोणते पुस्तक वाचले आहे, कोणते वाचले नाही, तसेच कोणत्या पुस्तकात कोणती गोष्ट आहे, हे देखील तिच्या व्यवस्थित ध्यानात आहे.
यावर्षीपासून तर ती पुस्तकांवरचा आपला अभिप्राय देखील द्यायला लागली आहे. तिची सर्जनशीलता विकसित व्हायला लागली आहे. अर्थात वाचनामुळेच ती आता स्वतः स्वतःच्या मनाने लिहू देखील लागली आहे! मागच्या काही महिन्यात तिने स्वरचित कविता देखील केल्या आहेत. स्वतःच्या कथा कवितांचे पुस्तक तिच्या आईने प्रकाशित करावे, अशी देखील तिची मनोकामना आहे. तिच्या वाचन वेडाचीच ही परिणीती आहे असे आम्हाला वाटते.
मागच्या नऊ वर्षांपासून आम्ही वाचन प्रेरणा दिनी विविध शाळांमध्ये पुस्तके वाटपाचा कार्यक्रम करतो. ज्ञानेश्वरी एक वर्षाची असल्यापासून तिला देखील आम्ही या कार्यक्रमांमध्ये नेत असतो. यातून तिला पुस्तकांचे वाचनाचे महत्त्व समजते. त्यातूनच विचारांची आणि मनाची समृद्धी देखील येते. याची जाणीव तिला हळूहळू होऊ लागली आहे.
आजच्या वाचन प्रेरणा दिनी तिच्या वाचनवेडाची ओळख व्हावी आणि इतरांनाही प्रेरणा मिळावी...  हाच या पोस्टचा मुख्य उद्देश.
















 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com