Saturday, October 19, 2024

बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या डॉ. मारिया मॉन्टेसरी

मानवी प्रगतीसाठी अत्यावश्यक असलेल्या मूलभूत घटक म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाने माणूस शहाणा बनतो, प्रगल्भ होतो. म्हणून सुयोग्य शिक्षण घेणे हा मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. आपल्या इतिहासामध्ये आजवर अनेक शिक्षणातज्ञांनी शिकवण्यासाठी नवनवीन पद्धती विकसित केल्या. वेगवेगळ्या संकल्पनांद्वारे बालशिक्षणाचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न केला. कालानुरूप नवनवे बदल होत गेले, नवीन विचार आत्मसात होत गेले आणि त्यातूनच मानवी प्रगतीची द्वारे उघडत गेली. अशाच शिक्षण पद्धतीच्या विकासामध्ये अर्ध्वयू असणारे नाव म्हणजे ‘मारिया मॉन्टेसरी’ होय.
आजकाल सर्वत्र माजलेल्या इंग्रजी शिक्षणाच्या स्तोमामध्ये मॉन्टेसरी पद्धतीच्या शाळा देखील वाढलेल्या दिसतात. याच मॉन्टेसरी पद्धतीच्या प्रणेत्या म्हणजे डॉ. मारिया मॉन्टेसरी होय. मागच्या शतकामध्ये त्यांनी शिक्षणाच्या एका नव्या पद्धतीचा पाया रचला. माणसाच्या शिक्षणाची सुरुवात जिथून होते त्या बालशिक्षणात नव्या संकल्पनांचा अंतर्भाव मॉन्टेसरी यांनी केला. याच मारीया मॉन्टेसरी यांची गोष्ट सांगणारे हे पुस्तक ‘बालशिक्षणाला नवं वळण देणाऱ्या डॉ. मारिया मॉन्टेसरी’.
भारताप्रमाणेच युरोपातीलही बहुतांश देशांमध्ये शतकभरापूर्वी शिक्षणाची आणि विशेषत: महिला शिक्षणाची परिस्थिती फारशी बरी नव्हती. एक विशिष्ट साचेबद्ध शिक्षण मुलांना दिले जायचे. यात मुलांच्या आवडीचा त्यांच्या मानसिकतेचा विचार करण्यास प्राथमिकता नव्हती. परंतु मॉन्टेसरी यांनी आपल्या अनुभवातून शिक्षणाचा नवा विचार रुजवला. शिकणे म्हणजे काय हे मारिया मॉन्टेसरी यांना व्यवस्थित समजले होते.  जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असते तेव्हा आपल्या मेंदूचा, क्रियांचा सुयोग्य वापर केला गेला पाहिजे.  याच दृष्टिकोनातून त्यांनी मॉन्टेसरी शिक्षण पद्धत विकसित केली.
मॉन्टेसरी या मूळच्या इटली मधल्या. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या अनुभवातून नवी साधने निर्माण केली. आणि यातूनच बालशिक्षण देण्यासाठी नवी पद्धती नावारूपास आणली. हळूहळू तिची उपयुक्तता लक्षात आल्याने इटलीबाहेर देखील तिचा प्रसार व्हायला लागला. संपूर्ण युरोपातून मॉन्टेसरी यांची मागणी वाढली. आणि लवकरच अमेरिकेसारख्या प्रगत देशात देखील मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचा शिरकाव झाला. बहुतांश शाळांनी या पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली. मॉन्टेसरी शाळांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना त्या स्वतः प्रशिक्षित करत असत. म्हणूनच त्यांचे जगभरात बहुतांश देशांमध्ये दौरे देखील झाले. विशेष म्हणजे भारताला देखील त्यांचा नऊ-दहा वर्षांचा सहवास लाभलेला आहे. या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्यांचे वास्तव्य होते. कोल्हापुरात त्यांनी मॉन्टेसरी पद्धतीची शाळा सुरू केली होती जी आजतागायत चालू आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या शैक्षणिक कार्यासाठी त्यांचे तीन वेळात नोबेल साठी नामांकन देखील झाले होते. त्यांना हा पुरस्कार मिळाला नसला तरी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा हा गौरवच मानायला हवा.
आज भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये चाललेला खेळखंडोबा पाहता शिक्षण हे शिक्षण न राहता फक्त आणि फक्त पैसा कमविण्याचे मोठे साधन बनलेले आहे. आपण खरोखर शिक्षणापासून दूर जात आहोत. केवळ मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी शिक्षण घेतले जाते. अर्थात बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हाच असतो. परंतु प्रयोग, ज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षणाचा पाया ज्या मॉन्टेसरींनी रचला त्या अजूनही अनेकांना समजलेल्या नाहीत. कदाचित या पुस्तकाचा त्यांना उपयोग होऊ शकेल.

--- तुषार भ. कुटे.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com