Friday, October 11, 2024

फुलवंती

पेशवेकाळातील एका लग्नाच्या बोलणीतील दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. वर पक्षाला हुंड्यामध्ये काहीही नकोय. पण अखंड हिंदुस्तानात गाजत असलेल्या फुलवंतीचा कलाविष्कार आपल्या इथे व्हावा, अशी त्यांची इच्छा आहे. मग शोध सुरू होतो फुलवंतीचा. अगदी दिल्लीच्या दरबारालाही वाट पाहायला लावणारी फुलवंती आपला नृत्याविष्कार इतक्या कलात्मकतेने सादर करते की बघणाऱ्यांच्या डोळ्याच्या पापण्याही लवत नाहीत. पूर्ण हिंदुस्थानामध्ये ती एकमेवाद्वितीय अशी नृत्यांगना आहे, जीला कुणाचीच तोड नाही.
अखेरीस पुण्याचे नाव ऐकल्याने ती पेशव्यांच्या पुण्यामध्ये यायला तयार होते. अर्थात ज्या मस्तानीच्या पायाची धूळ शनिवार वाड्याला लागलेली आहे, तिथेच तिला देखील आपले नृत्य सादर करायचे असते. इथून कथेची खरी सुरुवात होते. फुलवंती पुण्यामध्ये पोहोचते. पोहोचण्यापूर्वीच तिची पेशवे दरबारातील प्रकांड पंडित आणि धर्मशास्त्राचे सखोल ज्ञान असणाऱ्या वेंकटधारी नरसिंहशास्त्री यांच्याशी गाठ पडते. कदाचित पहिल्याच दृष्टीमध्ये ती नकळतपणे त्यांच्याकडे आकर्षित देखील होते. शनिवारवाड्यामध्ये नृत्य सादर करत असताना याच शास्त्रींकडून फुलवंतीचा अपमान केला जातो आणि सुरू होतो श्रेष्ठत्वाचा आणि अहंकाराचा खेळ. एका बाजूला धर्मशास्त्राचे महापंडित तर दुसऱ्या बाजूला जिला कोणीही हरवू शकत नाही, तिच्या कलेमध्ये उणीवही काढू शकत नाही, अशी फुलवंती. दोघेही एकमेकांचे आव्हान स्वीकारतात. दोघांपैकी कोण श्रेष्ठ? या प्रश्नाचे उत्तर चित्रपटाच्या उत्तरार्धात सापडते.
बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित असलेला हा चित्रपट. महाराष्ट्राच्या इतिहासाला धरून रचलेली ही एक कथा आहे. प्रेम, त्याग, अहंकार, गर्व, अशा विविध भावनांचे चित्रण या कथेतून समोर येते. आणि अंतिमतः एक विलक्षण कहानी अनुभवल्याची भावना रसिकांना मिळते. हेच या चित्रपटाचे यश आहे. स्नेहल तरडे यांचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच अनुभव यशस्वी झाल्याचे दिसते. एकंदर चित्रपट पाहताना दिग्दर्शक नवखा आहे, असे कुठेही भासत नाही. अनेक मराठी चित्रपटांमध्ये कमी असलेला भव्यदिव्यपणा या चित्रपटात ठासून भरलेला आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कृत्रिमता जाणवत नाही. प्राजक्ता माळीचे काम तर उत्कृष्टच. या चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तीच मराठीतील सर्वश्रेष्ठ नृत्यांगना आहे. बऱ्याचदा असे देखील जाणवतं की फुलवंतीची भूमिका तिच्यासाठीच लिहिली गेली असावी. अर्थात तिला फुलवंती अगदी अचूक समजल्याचे दिसते.  
शीर्षक गीत ‘फुलवंती’ आणि ‘मदनमंजिरी’ या दोन्ही गाण्यांमध्ये तिने जीव ओतून कला सादर केल्याचे दिसते. कदाचित तिचा आजवरचा हा सर्वोत्तम चित्रपट असावा. तिच्या व्यतिरिक्त गश्मीर महाजनी, वैभव मांगले, ऋषिकेश जोशी, चिन्मयी सुमित या सर्वांचीच कामे उत्कृष्ट झालेली आहेत. खरं सांगायचं तर दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांनी लक्ष्मीबाईंची भूमिका दुसऱ्या कोणत्यातरी अभिनेत्रीला द्यायला हवी होती. त्यांच्या भूमिकेमध्ये नैसर्गिकता जाणवत नाही. शिवाय पेशव्यांच्या भूमिकेत क्षितिज दाते फारसा उठून दिसत नाही. कथा अतिशय सूत्रबद्धतेने पडद्यावर साकारलेली दिसते. यावर्षीच्या चित्रपटांपैकी एक उत्तम चित्रपट आहे, असे ‘फुलवंती’ला म्हणता येईल.
चित्रपटातील तीनही गाणी लक्षात राहतात आणि गुणगुणावीशी वाटतात. नृत्यदिग्दर्शकाची कमाल पडद्यावर पाहायला मजा येते. हास्यजत्रेतले ‘सहा पुणेकर’ पडद्यावर गंभीर भूमिकेत असले तरी त्यांना पाहिल्यावर चेहऱ्यावर नकळत स्मित हास्य उमटते.
एकंदरीत पहिल्या दृश्यापासूनच चित्रपट खिळवून ठेवतो. कदाचित एकापेक्षा अधिक वेळा देखील आपण तो निश्चित पाहू शकतो. असा उत्तम चित्रपट नक्कीच चुकवू नका.

— तुषार भ. कुटे. 




No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com