मराठीमध्ये आजवर अनेक विज्ञानकथालेखकांनी वेगवेगळे प्रयोग केले. यातूनच विज्ञानातील विविध संकल्पना मराठी वाचकांना समजायला लागल्या. परंतु पॅरलल युनिव्हर्स अर्थात समांतर विश्व ही संकल्पना पहिल्यांदाच समर लिखित रेवन रॉय या कादंबरीतून मराठीमध्ये दिसून आली.
आपल्या विश्वाच्या समांतर देखील असेच आणखी एक विश्व आहे, ज्यात आपल्यासारखीच माणसे राहतात. बहुतांश वेळा ती आपल्याला स्वप्नातून देखील भेटतात, ही संकल्पना म्हणजे पॅरलल युनिव्हर्स होय. अर्थात याला पूर्ण वैज्ञानिक आधार नाही, परंतु सायन्स फिक्शनचा विचार केला तर यातून पाश्चिमात्य लेखकांनी बरंच लेखन केलेले आहे. तसं पाहिलं तर संकल्पना समजायला अवघडच. म्हणून कथा रूपात आणण्यासाठी लेखकाचे लेखनकौशल्य देखील पणाला लागते. हे शिवधनुष्य उचलून लेखकाने रेवन रॉय या कादंबरीद्वारे चांगला प्रयत्न केला आहे.
रेवन रॉय नावाच्या निराशावादी मानसशास्त्रज्ञाची ही गोष्ट. त्याच्यासोबत त्याचे आणखी सात सहकारी आहेत. आपल्या विश्वाला संपवण्यासाठी तो सर्वदूर असलेले चैतन्य संपवायला सुरुवात करतो. यातूनच समांतर विश्वातील दुसरा रेवन रॉय देखील समोर येतो. अशी पार्श्वभूमी असणारी ही कथा. अनेकदा ती किचकट वाटते. शिवाय एक घटना आपल्या विश्वात तर दुसरी समांतर विश्वामध्ये घडते, तेव्हा वाचक काहीसा गोंधळून जातो. अर्थात यामध्ये वाचकाची एकाग्रता असणे अधिक महत्त्वाचे वाटते. कथेची मांडणी आणि वेग चांगला आहे. अर्थात तो अधिक उत्तम असू शकला असता. परंतु यानिमित्ताने का होईना समांतर विश्वाची गोष्ट मराठी वाचकांना समजेल, अशी आशा वाटते.
Thursday, October 24, 2024
रेवन रॉय - समर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com