सन २०१५ पासून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती महाराष्ट्रामध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरी केली जाते. पहिल्याच वर्षापासून आम्ही देखील हा दिवस विविध शाळांमध्ये पुस्तक वाचन आणि वाटपाच्या कार्यक्रमाने साजरा करत आलो आहोत. या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक मराठी शाळांमध्ये जाऊन आम्ही विविध विषयांवरील पुस्तकांचे वितरण करतो. बालवयातच मुलांना शाळेमध्ये सहज पुस्तके उपलब्ध व्हावी आणि अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून आम्ही विविध बालसाहित्य शाळांना देत असतो.
यावर्षी पुण्यापासून शंभरपेक्षा अधिक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निगडाळे गावातील दोन शाळांची आम्ही निवड केली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत आणि भीमाशंकराच्या अभयारण्यात वसलेले निगडाळे हे गाव होय. अतिदुर्गम भागात असल्याने येथे सुखसोयी अन सुविधांची वानवाच आहे. शाळांचा पटदेखील फार मोठा नाही. परंतु मुलांचा उत्साह आणि शिकण्याची इच्छा मात्र वाखाणण्याजोगी आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसाळी प्रदेशात हा भाग येतो. म्हणूनच शाळेची इमारत देखील पावसाच्या पाऊल खुणा झेलत उभी असल्याची दिसली. पावसाचे चारही महिने धुक्यामध्ये असणारा हा परिसर. अशा खडतर परिस्थितीमध्ये इथली मुले शिक्षण घेत आहेत. आज पुस्तके वाटपाच्या निमित्ताने त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला. पुण्यावरून कोणीतरी पाहुणे आपल्याला पुस्तके भेट देण्यासाठी आलेली आहेत, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. पुस्तके वाटप झाल्यानंतर लगेचच ती वाचण्याची लगबग भारावून टाकणारी होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी योग्य शाळेच्या आणि मुलांच्या हातात वाचन संस्कृतीची आयुधे देत आहोत, याचे समाधान वाटले.
या शाळांतील शिक्षकांचे देखील कौतुक करावे तितके कमीच आहे. रोजचा जवळपास सत्तर किलोमीटरचा प्रवास करत ते शाळेमध्ये येतात. मुलांना शिक्षणाचे धडे गिरवायला शिकवतात. त्यांनी केलेली शाळेची सजावट देखील कौतुकास्पद होती. त्यांनी शाळेसाठी विविध सामाजिक संस्थांकडून अनेक उपकरणे देखील प्राप्त केलेली होती. त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी ते उत्तमरीत्या करतात, हे देखील प्रशंसनीय होते.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com