जुन्नर म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असणारा शिवनेरी किल्ला आठवतो. पुणे जिल्ह्याच्या उत्तरेला पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर जुन्नर शहर वसलेले आहे. अष्टविनायकांपैकी ओझर आणि लेण्याद्री ही दोन स्थाने देखील याच परिसरात आहेत. आधुनिक जुन्नरची ही ओळख सर्वज्ञात असली तरी या शहराची प्राचीन काळापासून असलेली ओळख ही या परिसरातील बौद्ध लेण्यांमुळे होते.
भारतामध्ये सर्वात अधिक मानवनिर्मित लेणी ही महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक लेणी ही जुन्नर परिसरामध्ये आहेत. सातवाहनांच्या काळात दोन ते सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी वसलेले हे शहर. तत्कालीन राज व्यवस्थेत राजधानी ही प्रतिष्ठान अर्थात पैठण येथे असली तरी जुन्नर हे व्यापाराच्या दृष्टीने सर्वात मोठे ठाणे होते. कल्याण आणि सोपारा बंदरांमध्ये समुद्रामार्गे आलेला माल जुन्नरमध्ये सह्याद्रीच्या कड्यांवर कोरलेल्या नाणेघाटातून सर्वप्रथम यायचा. तत्कालीन महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी बाजारपेठ होती, त्याला जीर्णनगर असेही म्हटले जायचे. सातवाहनांच्या राज्याची भरभराट होत असताना जुन्नर शहर मोठे होत होते. कोकण आणि देशाला जोडणारा जुन्नर हा एक दुवा होता. याच्या अनेक पाऊलखुणा आजही जुन्नर शहरांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसून येतात. सातवाहन राजे हे बौद्ध विचारधारेचे आश्रयदाते होते. नाणेघाटामार्गे जुन्नर आणि इतर परिसरामध्ये येणाऱ्या बौद्ध भिक्खूंसाठी आजूबाजूच्या डोंगरांमध्ये अनेक लेण्या खोदण्यात आल्या होत्या. याच लेण्या आज जुन्नरचे प्राचीन वैभव बनून स्थितप्रज्ञपणे उभ्या आहेत. सुमारे २०० लेण्या या परिसरामध्ये पाहता येतात. त्यांचे प्रामुख्याने सहा गट आहेत. शिवनेरी किल्ल्याच्या तीन दिशांना असणारा शिवनेरी गट, मानमोडी डोंगराच्या तीन बाजूंना असणारा भीमाशंकर गट, अंबा-अंबिका गट आणि भूतलेणी गट, लेण्याद्री डोंगरातील लेण्याद्री आणि सुलेमान गट, पिंपळेश्वर डोंगरातील तुळजा गट आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नाणेघाट लेण्या. जुन्नरच्या या प्राचीन वैभवांमध्ये बौद्ध लेण्यांची सर्व शिल्पे, वास्तुकला पाहता येतात. शिवाय या सर्व लेणी समूहांमध्ये तत्कालीन प्राकृत भाषेमध्ये आणि ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले शिलालेख देखील पाहता येतात. प्राचीन वास्तुकला अभ्यासकांसाठी तसेच बौद्धधर्म उपासकांसाठी जुन्नर म्हणजे एक आदर्श ठाणे आहे. मराठी आणि प्राकृत या दोन्ही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठीचे पुरावे याच परिसरातील नाणेघाट लेण्यांनी दिले. आज २००० वर्षांनंतर देखील या लेण्या महाराष्ट्राचं वैभव टिकवून आहेत.
अनेक संशोधकांनी जुन्नर परिसरातील शिलालेखांवर अभ्यास केला. याच अभ्यासकांपैकी एक म्हणजे शोभना गोखले होत. त्यांनी लिहिलेल्या जुन्नर इनस्क्रीप्शन्स या पुस्तकामध्ये प्राचीन जुन्नरचे विस्तृत वर्णन केलेले आहेत. तसेच इथल्या लेण्यांमधील असणारे सर्व शिलालेख सविस्तरपणे या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. शिवाय त्यांचा अर्थ देखील समजावून सांगितलेला आहे. १९ व्या शतकामध्ये सर्वप्रथम पश्चिम घाटातील लेणी व शिलालेखांवर अभ्यास झाला. याचा संदर्भ गोखले यांनी या पुस्तकांमध्ये दिलेला दिसून येतो.
केवळ जुन्नरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासावर सखोल प्रकाशझोत टाकणारे असे हे पुस्तक आहे. प्राचीन नाणेशास्त्राच्या अभ्यासक असणाऱ्या शोभना गोखले लिखित हे पुस्तक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने प्रकाशित केलेले आहे.
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com