Monday, December 30, 2024

केरीदा केरीदा

सई ताम्हणकर आणि अमेय वाघ अभिनेता गर्लफ्रेंड या मराठी चित्रपट मध्ये मराठी आणि स्पॅनिश यांचं मिश्रण केलेलं एक गाणं ऐकायला मिळतं. ‘केरीदा केरीदा केरीदा केरीदा मी तुझा नोविओ तू माझी नोविआ’...असे या गाण्याचे बोल.

स्पॅनिश आणि मराठी भाषेच्या सुरेख संगम ताल लय आणि सुरांमध्ये शब्दबद्ध केल्याचा दिसतो. याचे संगीत देखील छान आहे आणि दोन्ही भाषेतील शब्दांची सरमिसळ उत्तमरीत्या गुंफल्याची दिसते. असे प्रयोग संगीतामध्ये व्हायलाच हवे यातून नाविन्य निर्मिती होते. जसराज जोशी आणि शाल्मली खोलगडे यांच्या आवाजातील क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेले हे गीत युट्युबवर उपलब्ध आहे ऐकायला विसरू नका. 


https://www.youtube.com/watch?v=Ysg0vVEyHHM

 


 

 

 


Tuesday, December 24, 2024

एक तारा आणि रंगकर्मी

गावाकडून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये राहून शहराकडे आलेला एक तरुण आहे. त्याच्या अंगी कला गुण आहे. तो जोपासण्यातच त्याचे आयुष्य चाललेले आहे. आजूबाजूच्या लोकांना त्याच्या कलागुणांची कदर असते तर काहींना नसतेही.
परंतु एक दिवस तो शहरामध्ये येतो. शहरातल्या लोकांना त्याच्या कलागुणांची कदर असते. कलाक्षेत्रात प्रवेश करताना त्याचा संघर्ष सुरू होतो. परंतु आत्मविश्वासाने एकेक पायरी टाकत तो आपल्या कलाक्षेत्रामध्ये उच्च शिखर पादाक्रांत करतो. मिळालेले यश प्रत्येकालाच टिकवता येत नाही. असंच काहीसं त्याच्या बाबतीत होतं. यशाची धुंदी त्याच्यावर चढते आणि याच कारणास्तव तो दारूच्या धुंदीतही राहू लागतो. व्यभिचार सुरु होतो... आणि त्यात तो वाहवत जातो. हळूहळू त्याला आपल्या लोकांचाही विसर पडू लागतो. आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या लोकांना देखील तो विसरू लागतो आणि एक दिवस अचानक आपल्या बेशिस्त स्वभावामुळे त्याची अपयशाकडे वाटचाल चालू होते. परंतु त्यातूनही तो सुधारत नाही. मी म्हणजे सर्वस्व, मी या जगामध्ये काहीही करू शकतो, अशा विचारांनी बेभान झालेला तो अचानक जमिनीवर येतो. परंतु तोवर वेळ निघून गेलेली असते!
यश मिळवण्यासाठी अखंड मेहनत गरजेची आहे, परंतु ते टिकवण्यासाठी जीवनात शिस्त आणि संयम देखील गरजेचं असतो. अशी शिकवण देणारे हे दोन्ही चित्रपट! दोन्हींचा आशय सारखा आहे, कथा मात्र वेगळी! एक गायक तर दुसरा रंगकर्मी! दोघांचाही शून्यापासून सुरू झालेल्या प्रवास या चित्रपटांमध्ये पाहता येतो.
खरं तर ही एक शिकवण आहे, त्या प्रत्येकासाठी ज्यांना यशाच्या शिखरावर पोहोचायचे आहे आणि ते यश शेवटपर्यंत टिकवून देखील दाखवायचं आहे. हवं तर त्यांना आपण बोधकथा असं देखील म्हणू शकतो.



 

Sunday, December 22, 2024

पुस्तक महोत्सवात ज्ञानेश्वरी

पुणे पुस्तक महोत्सवामध्ये आज प्रचंड गर्दी झाली होती. आमच्या स्टॉलमध्ये वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी बऱ्यापैकी मोकळी जागा ठेवलेली होती. तरी देखील अनेकांना चालता येत नव्हते. आमच्यावरील बिलिंगचा भार देखील वाढलेला होता. अशावेळी ज्ञानेश्वरीने एका बिलबुकाची सूत्रे स्वतःच्या हाती घेतली. आणि पटापट एका बाजूने ती बिले करू लागली. पुस्तकांची नावे लिहून, त्यांची किंमत लिहून त्यावरील सवलतीसह किती किंमत आहे, हे ती पटापट बिलांवर लिहित होती आणि अंतिम बिल बनवून देत होती. तिचा आम्हाला बराच हातभार लागला. पुस्तके विकत घेतल्यानंतर बिल करण्यासाठी येणारे वाचक तिच्याकडे कौतुकाने पाहत होते. इतकी लहान मुलगी पटापट बिले लिहून त्यांना देत असताना दिसली. अनेकांनी तिचे तोंड भरून कौतुक देखील केले. काहींनी फोटो काढले. अनेकांनी तर त्यांच्यासोबत आलेल्या मुलांना दाखवले देखील की, बघ ती मुलगी कसं काम करत आहे!
इतकी लहान मुलगी पटापट मराठीमध्ये कसं लिहू शकते? विशेष म्हणजे तिचे आकडेदेखील मराठीमध्ये होते, याचे देखील खूप आश्चर्य वाटलं. ती मराठी माध्यमामध्ये शिकत आहे, हे ऐकल्यावर काहींचे डोळे विस्फारले होते. पुस्तकांच्या जगात वावरताना दिवसभर तिची आम्हाला हातभार लावण्यासाठी चाललेली चाललेली लगबग अखेरीस रात्री महोत्सव बंद होईपर्यंत चालूच होती. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिची यावर्षीची पुस्तकांची खरेदीही खूप मोठी झाली!

--- तुषार भ. कुटे 



पुणे पुस्तक महोत्सवातील परकीय पाहुणे

आज पुणे पुस्तक महोत्सवामध्ये या दोन परदेशी व्यक्तींनी लक्ष वेधून घेतले. ते जवळपास सर्व स्टॉलवर फिरत होते. इथली गर्दी बघून त्यांचे व्हिडिओ देखील काढत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुक मिश्रित आश्चर्याचे भाव दिसून आले. महोत्सवामध्ये पुस्तके पाहण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी झालेली गर्दी पाहून ते आश्चर्यचकित झाले असावेत. पुस्तकांनी भरलेल्या मोठमोठ्या पिशव्या घेऊन जाणाऱ्या लोकांचे त्यांनी नकळत फोटो देखील काढले. एकंदरीत पुणेकरांच्या वाचनप्रेमाने ते भारावून गेले होते. भारतीयांविषयी तसेच इथल्या वाचन संस्कृतीविषयी त्यांच्या मनात निश्चितच सकारात्मक भावना निर्माण झाली असावी, हे मात्र निश्चित.


 

Friday, December 6, 2024

नागणिका - शुभांगी भडभडे

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या मराठी प्रदेशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे साम्राज्य म्हणजे सातवाहन साम्राज्य होय. जवळपास साडेचारशे वर्षे सातवाहन राज्यांनी महाराष्ट्राची राज्यव्यवस्था चालवली. एका अर्थाने त्यांनी महाराष्ट्र घडवलादेखील! पुरातन किल्ले, लेणी, वास्तु अशा विविध पुराव्यांद्वारे सातवाहनांचा इतिहास इतिहासकारांनी महाराष्ट्रासमोर आणला. परंतु आजही बहुतांश सातवाहन राजांचा इतिहास हा अज्ञातच आहे.
जुन्नरजवळचा नाणेघाट हा सातवाहन राजवटीमध्येच बांधला गेला. शिवाय सुमारे दोन ते सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेले शिलालेख आजही इथे वाचायला मिळतात. याच शिलालेखांमधून सातवाहनांच्या दुसऱ्या पिढीतील राणी नागणिका हिची ओळख इतिहासकारांनी महाराष्ट्राला करून दिली. येथील शिलालेखांद्वारे सातवाहनांच्या राज्यपद्धतीविषयी बरीचशी माहिती प्राप्त झाली. परंतु ती अजूनही नगण्य प्रकारातीलच आहे. दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांची पत्नी म्हणजे नागणिका होय. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना भारतीय समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान नव्हते तर दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्टच निराळी. अशा काळामध्ये एका स्त्री राज्यकर्तीने सातवाहनांच्या मराठी देशाचा कारभार चालवला होता, ही निश्चितच अत्यंत अभिमानाची आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. या शकनिका असणाऱ्या नागणिका राणीची काराकीर्द निश्चितच भूषणावह राहिली असणार, यात शंका नाही. हाच धागा पकडून शुभांगी भडभडे यांनी नागणिका राणीच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी लिहिलेली आहे!
कादंबरीची सुरुवात होते दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांच्या राज्यकारभारापासून. सातवाहनांच्या एकंदरीत राज्य रचनेची माहिती आपल्याला विविध घटनांद्वारे होते. सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर उदयास आलेल्या सातवाहन साम्राज्याचा उद्देश, ध्येय आणि प्रगती दिसायला लागते. श्रीसातकर्णी यांचा व्यापारविषयक, लष्करविषयक धर्मविषयक दृष्टिकोन आपल्याला समजून येतो. खरंतर सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश बौद्ध लेणी स्थापन करण्यात आली होती. यामागील त्यांचे उद्दिष्ट देखील विविध संवादांद्वारे वाचायला मिळते. वैदिक धर्माचा अवलंब करत असले तरी बौद्ध आणि जैन धर्माविषयी सातवाहनांचा दृष्टिकोन लक्षात येतो. खरंतर बहुतांश ठिकाणी वैदिक धर्मातील त्रुटींवर मात करण्यासाठी सातवाहन काय करत होते, हे देखील समजते. जवळपास निम्म्यापर्यंत कादंबरी श्रीसातकर्णी यांच्या राजवटीवरच आधारलेली दिसून येते. कालांतराने सातकर्णी राजांचा मृत्यू होतो. दोघेही युवराज वेदिश्री आणि शक्तिश्री हे अल्पवयीन असतात आणि याच कारणास्तव सर्वात ज्येष्ठ राणी नागणिका सर्व कारभार हाती घेते. राज्याची घडी बसवायला सुरुवात करते. एका कुशल आणि सुसंस्कृत राज्यकर्तीप्रमाणे राज्यकारभार हाकायला लागते. श्रीमुख सातवाहन आणि श्रीसातकर्णी यांचा सहवास लाभला असल्याने नागणिकाला त्यांचा राज्याविषयक दृष्टिकोन आणि धोरणे पक्की माहीत असतात. त्यांचा अवलंब करत नागणिका सातवाहन राज्य सांभाळू लागते. यामध्ये तिला धाकट्या राणीचे, धाकट्या युवराजांचे तसेच अपरांत देशाच्या राजाचे बंड देखील झेलावे लागते. परंतु त्यातून ती सहीसलामत योग्य मार्ग काढून राज्यकारभार सुरळीत कसा होईल, याकडेच लक्ष देते.
सातवाहनांचा व्यापार मोठ्या प्रमाणात कल्याण व सोपारा या बंदरांद्वारे ग्रीक राजसत्तांशी होत होता. याकरिता सुलभ व्यापारी मार्ग बनवावा म्हणून ती स्वतः पुढाकार घेऊन जुन्नरजवळच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये घाट बनवायला सुरुवात करते. हाच नाणेघाट होय. कादंबरीच्या उत्तरार्धामध्ये नाणेघाटाचे बांधकाम सुरू असताना बऱ्याचदा विविध घटनांचा उल्लेख येतो आणि येत राहतो. अखेरीस शेवटच्या प्रकरणामध्ये हा व्यापारी मार्ग तयार होतो. नागणिकाराणी आणि तिचे इतर मंत्री घाट बघण्यासाठी जुन्नरला जातात. तो अतिशय उत्तम तयार झालेला असतो. त्याकरता तिने शिलालेख देखील लिहून घेतलेले असतात. ते वाचून ती समाधानी होते. सह्याद्रीच्या सौंदर्याकडे बघत बघतच कादंबरी समाप्त होते.
सातवाहन साम्राज्यावर आधारित असणारी कदाचित ही मराठीतील एकमेव कादंबरी असावी. जवळपास ८०% भाग हा संवादांनी व्यापलेला आहे. त्यातून तत्कालीन विविध व्यक्तिमत्त्वांचे दर्शन लेखिका आपल्याला करून देतात. तसं पाहिलं तर कादंबरीमध्ये फारशा नाट्यमय घटना नाहीत. केवळ नागणिका राणीची ओळख करून देणे, हाच एकमेव उद्देश असावा असे दिसते. ज्यांना सातवाहन राजांविषयी बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना घटना पात्रे आणि ठिकाणी व्यवस्थित उमजतील. त्यामुळे कादंबरी वाचण्याआधी सातवाहन राजांविषयी माहिती करून घेणे फायद्याचे ठरेल.
एका अर्थाने ही माहितीपूर्ण कादंबरी आहे. श्रीमुख सातवाहन, श्रीसातकर्णी, राजकुमार वेदीश्री आणि शक्तीश्री, महारथी त्रणकायीर ही पात्रे वगळता इतर सर्व पात्रे काल्पनिक आहेत. अर्थात इतिहासामध्ये त्यांच्या नावाविषयी कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. परंतु कथेची गरज असल्याने लेखिकेने त्यांचा अंतर्भाव कादंबरीमध्ये केला असावा. एकंदरीत भाषा सुंदर आणि ऐतिहासिक प्रकारातील आहे. ज्यामध्ये अन्य भाषांमधून आलेले कोणतेही शब्द वापरलेले नाहीत, हे विशेष. सर्व शहरांची नावे तसेच भागांची नावे जसे अपरांत, अश्मक, दंडकारण्य इत्यादी (जुन्नर वगळता) सातवाहनकालीन आहेत. म्हणूनच आपण कथेमध्ये गुंतून राहतो. एका ठिकाणी वैदिकधर्म ऐवजी हिंदू हा उल्लेख केलेला आहे. बाकी कादंबरी उत्तमच.
नाणेघाटातल्या एका शिलालेखावरून राणी नागणिकाची प्रतिमा कशी असेल, हे लेखिकेने उत्तमरीत्या या कादंबरीद्वारे वठवलेले आहे. व्यापारी मार्गाची आवश्यकता, बौद्ध विहारांची उपयुक्तता, कार्षापण या नाण्याचा विनीयोग अशा विविध मुद्द्यांवर उत्तम विवेचन लेखिकेने या कादंबरीद्वारे केल्याचे दिसते. एकंदरीत सातवाहनांविषयी कादंबरीद्वारे जाणून घेणाऱ्या वाचकांना हा एक उत्तम स्त्रोत ठरेल, यात शंका नाही.