Friday, December 6, 2024

नागणिका - शुभांगी भडभडे

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आपल्या मराठी प्रदेशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे साम्राज्य म्हणजे सातवाहन साम्राज्य होय. जवळपास साडेचारशे वर्षे सातवाहन राज्यांनी महाराष्ट्राची राज्यव्यवस्था चालवली. एका अर्थाने त्यांनी महाराष्ट्र घडवलादेखील! पुरातन किल्ले, लेणी, वास्तु अशा विविध पुराव्यांद्वारे सातवाहनांचा इतिहास इतिहासकारांनी महाराष्ट्रासमोर आणला. परंतु आजही बहुतांश सातवाहन राजांचा इतिहास हा अज्ञातच आहे.
जुन्नरजवळचा नाणेघाट हा सातवाहन राजवटीमध्येच बांधला गेला. शिवाय सुमारे दोन ते सव्वा दोन हजार वर्षांपूर्वी कोरलेले शिलालेख आजही इथे वाचायला मिळतात. याच शिलालेखांमधून सातवाहनांच्या दुसऱ्या पिढीतील राणी नागणिका हिची ओळख इतिहासकारांनी महाराष्ट्राला करून दिली. येथील शिलालेखांद्वारे सातवाहनांच्या राज्यपद्धतीविषयी बरीचशी माहिती प्राप्त झाली. परंतु ती अजूनही नगण्य प्रकारातीलच आहे. दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांची पत्नी म्हणजे नागणिका होय. सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्त्रियांना भारतीय समाजामध्ये प्रतिष्ठेचे स्थान नव्हते तर दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्टच निराळी. अशा काळामध्ये एका स्त्री राज्यकर्तीने सातवाहनांच्या मराठी देशाचा कारभार चालवला होता, ही निश्चितच अत्यंत अभिमानाची आणि महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. या शकनिका असणाऱ्या नागणिका राणीची काराकीर्द निश्चितच भूषणावह राहिली असणार, यात शंका नाही. हाच धागा पकडून शुभांगी भडभडे यांनी नागणिका राणीच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी लिहिलेली आहे!
कादंबरीची सुरुवात होते दुसरे सातवाहन राजे श्रीसातकर्णी यांच्या राज्यकारभारापासून. सातवाहनांच्या एकंदरीत राज्य रचनेची माहिती आपल्याला विविध घटनांद्वारे होते. सम्राट अशोकाचा मृत्यू झाल्यानंतर उदयास आलेल्या सातवाहन साम्राज्याचा उद्देश, ध्येय आणि प्रगती दिसायला लागते. श्रीसातकर्णी यांचा व्यापारविषयक, लष्करविषयक धर्मविषयक दृष्टिकोन आपल्याला समजून येतो. खरंतर सातवाहन काळामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश बौद्ध लेणी स्थापन करण्यात आली होती. यामागील त्यांचे उद्दिष्ट देखील विविध संवादांद्वारे वाचायला मिळते. वैदिक धर्माचा अवलंब करत असले तरी बौद्ध आणि जैन धर्माविषयी सातवाहनांचा दृष्टिकोन लक्षात येतो. खरंतर बहुतांश ठिकाणी वैदिक धर्मातील त्रुटींवर मात करण्यासाठी सातवाहन काय करत होते, हे देखील समजते. जवळपास निम्म्यापर्यंत कादंबरी श्रीसातकर्णी यांच्या राजवटीवरच आधारलेली दिसून येते. कालांतराने सातकर्णी राजांचा मृत्यू होतो. दोघेही युवराज वेदिश्री आणि शक्तिश्री हे अल्पवयीन असतात आणि याच कारणास्तव सर्वात ज्येष्ठ राणी नागणिका सर्व कारभार हाती घेते. राज्याची घडी बसवायला सुरुवात करते. एका कुशल आणि सुसंस्कृत राज्यकर्तीप्रमाणे राज्यकारभार हाकायला लागते. श्रीमुख सातवाहन आणि श्रीसातकर्णी यांचा सहवास लाभला असल्याने नागणिकाला त्यांचा राज्याविषयक दृष्टिकोन आणि धोरणे पक्की माहीत असतात. त्यांचा अवलंब करत नागणिका सातवाहन राज्य सांभाळू लागते. यामध्ये तिला धाकट्या राणीचे, धाकट्या युवराजांचे तसेच अपरांत देशाच्या राजाचे बंड देखील झेलावे लागते. परंतु त्यातून ती सहीसलामत योग्य मार्ग काढून राज्यकारभार सुरळीत कसा होईल, याकडेच लक्ष देते.
सातवाहनांचा व्यापार मोठ्या प्रमाणात कल्याण व सोपारा या बंदरांद्वारे ग्रीक राजसत्तांशी होत होता. याकरिता सुलभ व्यापारी मार्ग बनवावा म्हणून ती स्वतः पुढाकार घेऊन जुन्नरजवळच्या सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये घाट बनवायला सुरुवात करते. हाच नाणेघाट होय. कादंबरीच्या उत्तरार्धामध्ये नाणेघाटाचे बांधकाम सुरू असताना बऱ्याचदा विविध घटनांचा उल्लेख येतो आणि येत राहतो. अखेरीस शेवटच्या प्रकरणामध्ये हा व्यापारी मार्ग तयार होतो. नागणिकाराणी आणि तिचे इतर मंत्री घाट बघण्यासाठी जुन्नरला जातात. तो अतिशय उत्तम तयार झालेला असतो. त्याकरता तिने शिलालेख देखील लिहून घेतलेले असतात. ते वाचून ती समाधानी होते. सह्याद्रीच्या सौंदर्याकडे बघत बघतच कादंबरी समाप्त होते.
सातवाहन साम्राज्यावर आधारित असणारी कदाचित ही मराठीतील एकमेव कादंबरी असावी. जवळपास ८०% भाग हा संवादांनी व्यापलेला आहे. त्यातून तत्कालीन विविध व्यक्तिमत्त्वांचे दर्शन लेखिका आपल्याला करून देतात. तसं पाहिलं तर कादंबरीमध्ये फारशा नाट्यमय घटना नाहीत. केवळ नागणिका राणीची ओळख करून देणे, हाच एकमेव उद्देश असावा असे दिसते. ज्यांना सातवाहन राजांविषयी बऱ्यापैकी माहिती आहे, त्यांना घटना पात्रे आणि ठिकाणी व्यवस्थित उमजतील. त्यामुळे कादंबरी वाचण्याआधी सातवाहन राजांविषयी माहिती करून घेणे फायद्याचे ठरेल.
एका अर्थाने ही माहितीपूर्ण कादंबरी आहे. श्रीमुख सातवाहन, श्रीसातकर्णी, राजकुमार वेदीश्री आणि शक्तीश्री, महारथी त्रणकायीर ही पात्रे वगळता इतर सर्व पात्रे काल्पनिक आहेत. अर्थात इतिहासामध्ये त्यांच्या नावाविषयी कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. परंतु कथेची गरज असल्याने लेखिकेने त्यांचा अंतर्भाव कादंबरीमध्ये केला असावा. एकंदरीत भाषा सुंदर आणि ऐतिहासिक प्रकारातील आहे. ज्यामध्ये अन्य भाषांमधून आलेले कोणतेही शब्द वापरलेले नाहीत, हे विशेष. सर्व शहरांची नावे तसेच भागांची नावे जसे अपरांत, अश्मक, दंडकारण्य इत्यादी (जुन्नर वगळता) सातवाहनकालीन आहेत. म्हणूनच आपण कथेमध्ये गुंतून राहतो. एका ठिकाणी वैदिकधर्म ऐवजी हिंदू हा उल्लेख केलेला आहे. बाकी कादंबरी उत्तमच.
नाणेघाटातल्या एका शिलालेखावरून राणी नागणिकाची प्रतिमा कशी असेल, हे लेखिकेने उत्तमरीत्या या कादंबरीद्वारे वठवलेले आहे. व्यापारी मार्गाची आवश्यकता, बौद्ध विहारांची उपयुक्तता, कार्षापण या नाण्याचा विनीयोग अशा विविध मुद्द्यांवर उत्तम विवेचन लेखिकेने या कादंबरीद्वारे केल्याचे दिसते. एकंदरीत सातवाहनांविषयी कादंबरीद्वारे जाणून घेणाऱ्या वाचकांना हा एक उत्तम स्त्रोत ठरेल, यात शंका नाही.


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com