एखादी राज्यव्यवस्था अथवा प्रशासनव्यवस्था यशस्वी होण्यामागे उत्तम हेरव्यवस्था कारणीभूत असते. कोणत्याही महान साम्राज्याचा गुप्तहेर हा कणाच असतो, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशा प्राचीन गुप्तहेरयंत्रणेचा सखोल आणि सविस्तर आढावा घेणारे हे पुस्तक, “वरूण ते बहिर्जी: शोध प्राचीन हेरगिरीचा”.
भारतीय लिखित साहित्यामध्ये हेरगिरीचा पहिला संदर्भ सापडतो तो ऋग्वेदामध्ये वरूण याच्या रूपाने. त्यानंतर विविध राज्यव्यवस्थांनी हेरगिरीचा वापर करून आपला साम्राज्यविस्तार केला. अर्थात याविषयी अतिशय तुरळक पुरावे इतिहासामध्ये उपलब्ध आहेत. हेरगिरीचे पुरावे सापडतील ती उत्तम हेरगिरी कसली? भारतीय राजनीतीशास्त्रामध्ये हेरगिरीचा इतिहास बऱ्यापैकी प्राचीन आहे. ऋग्वेदकाळापासून सुरू झालेला हा प्रवाह व्यास, वाल्मिकी, शुक्राचार्य, भारद्वाज, कौटिल्य अर्थात चाणक्य, कामंदक, तिरुवल्लुवर यांच्यापासून शिवकाळातील बहिर्जी नाईक यांच्यापर्यंत आहे. या प्रदीर्घ हेरगिरीचा संशोधनात्मक आढावा घेणारे पुस्तक लेखक रवी आमले यांनी असंख्य ऐतिहासिक संदर्भांचा अभ्यास करून लिहिल्याचे दिसते. त्याची सुरुवात अर्थातच ऋग्वेद काळापासून होते. तदनंतर रामायण महाभारतामधील हेररचनेचा आढावा त्यांनी या पुस्तकात घेतलेला आहे. गुप्तहेरांच्या कार्यपद्धतीवर तसेच शासनव्यवस्थेमध्ये गुप्तहेर व्यवस्था कशी असावी, यावर प्रकाश टाकणारे पुस्तक कौटिल्यांनी लिहिले. त्यातील गुप्तहेरव्यवस्थेची रचना व मांडणी राज्यव्यवस्थेला कशी पूरक असावी अथवा तिने कार्य कसे करावे, याविषयी माहिती कोणत्याही सम्राटाला असायला हवीच अशी आहे. मराठा साम्राज्याची स्थापना करताना छत्रपती शिवरायांचे विचार आणि कौटिल्याचे विचार हे जवळपास जुळत असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये मुस्लिम शासनकर्त्यांचे पहिले आगमन अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने झाले. तेराव्या शतकाच्या अखेरीस खिलजीने अनपेक्षितपणे देवगिरीवर हल्ला केला. खरंतर हे देवगिरीच्या गुप्तहेर यंत्रणेचे सर्वात मोठे अपयश होते, ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. याच क्षणापासून कित्येक शतके महाराष्ट्रावर इस्लामी राजसत्ता राज्य करत होत्या.
पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये हेरव्यवस्थेच्या वरील ऊहापोहासोबतच मुस्लिम हेरसंस्थांविषयी देखील लेखकाने विस्तृतपणे लिहिलेले आहे. शिवाय भारतावर प्रदीर्घ काळ राज्य करणारे मुघल व त्यांची हेरव्यवस्था कशी होती, याचे देखील वर्णन आपल्याला वाचायला मिळते. अगदी बाबर ते औरंगजेबापर्यंत गुप्तहेरांनी कित्येक कारस्थाने तडीस नेली होती, हे देखील समजते. पुस्तकातील दुसरा भाग पूर्णतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर व त्यांच्या हेरव्यवस्थेवर प्रकाश टाकणार आहे. बहिर्जी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख. परंतु ऐतिहासिक पुराव्यांमध्ये त्यांच्याविषयी अतिशय तुरळक माहिती दिसून येते. एका अंगाने हे गुप्तहेर यंत्रणेचे सर्वोत्तम यश आहे, असेच मानायला हवे. परंतु याच कारणास्तव बहिर्जी नाईक व त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेविषयी ठोस माहिती कोणत्याही इतिहासकाराला आजवर सांगता आलेली नाही. तरी देखील रवी आमले यांनी उपलब्ध पुराव्यांचा आधार घेऊन तसेच अनेक ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ चाळून शिवाजी महाराजांच्या विविध योजनांमध्ये गुप्तहेर यंत्रणेचा किती मोठा वाटा होता किंबहुना त्यांच्या अनेक योजना केवळ सक्षम गुप्तहेर यंत्रणेमुळेच यशस्वीपणे पार पडल्या, हे सिद्ध केले आहे. शिवरायांना खऱ्या अर्थाने गनिमी काव्याच्या चाली खेळताना गुप्तहेर यंत्रणा किती महत्त्वाची आहे, हे समजले होते. कदाचित आजवर अन्य कोणत्याही राजाने शिवरायांनी इतका हेरसंस्थेचा अचूक वापर केला नसावा. अतिशय कमी कालावधीमध्ये आणि मोजक्याच सहकाऱ्यांच्या साह्याने अचूक लक्ष्यवेध करताना शिवरायांना त्यांच्या गुप्तहेर यंत्रणेचे कशा पद्धतीने सहाय्य मिळाले असावे, याचे विस्तृत विवेचन या पुस्तकांमध्ये वाचायला मिळते. अफजलखानाच्या फौजेशी जावळीच्या खोऱ्यात झालेली लढाई असो किंवा औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान याची पुण्यात बोटे छाटून केलेली फजिती असो. यामध्ये गुप्तहेर यंत्रणेचा बहुमोल वाटा होता. शिवाय शिवाजी महाराजांनी सुरतेवर दोनदा टाकलेल्या छाप्याची यशस्विता देखील गुप्तहेर यंत्रणेवरच आधारलेली होती. अशा अनेक योजना सफलपणे पार पाडण्यासाठी शिवाजी महाराजांनी अतिशय छोट्या छोट्या बाबींचा सखोल अभ्यास केल्याचे दिसते. शिवाजी महाराज हे केवळ राज्यकर्ते नव्हते तर ते एक कुशल सेनानी आणि मराठ्यांच्या व्यवस्थापन शास्त्राचे जनक देखील होते, हीच भावना आपल्या मनात तयार होते. अर्थात यामागे बहिर्जी नाईकांनी मराठ्यांच्या मुलखामध्ये तसेच शत्रूच्या गोटामध्ये देखील तयार केलेली सक्षम हेरयंत्रणा कारणीभूत होती, ही गोष्ट सिद्ध होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोमंतक भूमी गनिमी काव्याने हस्तगत करण्याची शिवरायांची योजना असफल ठरली. ही बाब वगळता शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचे कोणतेही अपयश इतिहासामध्ये प्रकर्षाने जाणवत नाही.
बहिर्जी नाईक यांच्यावर संशोधनात्मक दृष्ट्या लिहिलेले हे कदाचित मराठीतील पहिलेच पुस्तक असावे. अतिशय तुरळक माहिती असलेल्या शिवरायांच्या या मावळ्याविषयी अभ्यास करून संशोधनात्मक ग्रंथ सादर करणे अतिशय अवघड कार्य होते. त्यामुळेच लेखकाच्या एकंदरीत मेहनतीला दंडवत करावा, असेच हे पुस्तक आहे. बहिर्जी नाईक यांच्या विषयी आज-काल समाजमाध्यमांद्वारे जनमानसात पसरत असलेल्या स्वयंघोषित व्याख्यातांद्वारे दिली झालेली चुकीची माहिती नक्की कोणती व त्याचा स्त्रोत काय, याचा देखील ऊहापोह या पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणांमध्ये आपल्याला वाचता येतो. शिवरायांचे हेर हे त्यांचे तृतीय नेत्र म्हणूनच काम करत होते, याची प्रचिती येते. इतिहासाच्या पानांमध्ये कोणताही पुरावा न सोडणारी शिवाजी महाराजांची हेरयंत्रणा किती सक्षमपणे कार्य करत होती, याची देखील माहिती होते.
हे पुस्तक म्हणजे कादंबरी नाही. परंतु गुप्तहेरांच्या इतिहासाला वैज्ञानिक दृष्टी देणारा एक शास्त्रीय ग्रंथ आहे, असे मानायला काही हरकत नाही.
— तुषार भ. कुटे.