“हिंदी ही आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही तर केवळ अधिकृत भाषा आहे.” असे परखड आणि खरे मत नुकताच निवृत्त झालेला भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केले. आणि त्याचबरोबर समाजमाध्यमांवर याविषयी विविध प्रतिक्रिया प्रतिक्रियांचा पाऊस पडायला लागला. या प्रतिक्रियांद्वारे भारतीय जनमानस ‘राष्ट्रभाषा’ या संकल्पनेला कोणत्या दृष्टीने पाहते, याचा निश्चितपणे प्रत्यय आला. मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तीनही प्रकारच्या वृत्तपत्रांनी आणि माध्यमांनी या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिली. त्यांनाही माहित होते की, या बातमीला मोठ्या प्रमाणात लाईक, शेअर्स आणि कमेंट्सचा पाऊस पडणार आहे. आणि झाले देखील तसेच.
मराठी वृत्तपत्रांच्या समाजमाध्यमांवर या बातमीला ठळकपणे प्रसिद्धी दिली होती. विशेष म्हणजे त्यांनी अश्विनच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे, असं देखील म्हटलं होतं. खरंतर भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या गोष्टी वादाच्या कशा होऊ शकतात? हा मोठा प्रश्न आहे. परंतु समाजमाध्यमांवर लोकांची गर्दी खेचण्यासाठी वर्तमानपत्रे कशा पद्धतीने बातम्या देऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण यातून समोर आले. भारताला कोणत्याही प्रकारची राष्ट्रभाषा नाही, हे शंभर टक्के सत्य आहे. परंतु स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये उत्तर भारतातील हिंदी या भाषेला तिथल्या राजकारण्यांनी राष्ट्रभाषा म्हणून सातत्याने पुढे आणले. शासकीय व्यवहाराची भाषा अर्थात राजभाषा हा दर्जा हिंदीला आधीच मिळालेला होता. त्याचा अर्थ राष्ट्रभाषा असा लावत उत्तर भारतासह पश्चिम आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये देखील हिंदीला त्रिभाषा सूत्राद्वारे सातत्याने अहिंदी राज्यांमध्ये प्रसारित केले गेले. महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली तर मराठी ही आपली राजभाषा तिची आणि हिंदीची लिपी एकच अर्थात देवनागरी आहे. शिवाय व्याकरणामधील आणि शब्दांमधील साम्यामुळे मराठी लोक हिंदी भाषा लवकर अवगत करतात. याचा महाराष्ट्रात हिंदीचा प्रसार होण्यासाठी चांगला उपयोग झाला. मागच्या ७५ वर्षांचा आढावा घेतला तर आपल्या देशाचे बहुतांश पंतप्रधान हे उत्तर भारतातीलच होते. आत्तापर्यंत महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या मोठ्या आणि प्रगत राज्यांना कधीही देशाचे पंतप्रधानपद मिळाले नाही. सार्वत्रिक निवडणुकांमधून निवडून आलेल्या सर्वच राजकारण्यांनी हिंदीचा प्रामुख्याने प्रचार करायला सुरुवात केली. आणि नकळतपणे अधिकृतपणे नसले तरी हिंदी लोकांच्या मनावर राष्ट्रभाषा म्हणून बिंबवण्यात बहुतांशी ते यशस्वी झाले. १०० वर्षांपूर्वी आपल्या देशात हिंदीचा फारसा बोलबाला नव्हता. परंतु मागील काही वर्षांमध्ये उत्तर भारतातील अनेक भाषा गिळंकृत करून हिंदी वाढत गेली. हळूहळू उत्तर भारतीय बोलींचा प्रभाव संपला. आज ४०% पेक्षा अधिक लोकांना हिंदी आमची मातृभाषा आहे, असे वाटते! याच कारणास्तव जी भाषा सगळ्यात जास्त बोलली जाते तीच या देशाची राष्ट्रभाषा आहे, असे उत्तर भारतीयांनी उर्वरित भारतीयांच्या मनावर ठसवायला सुरुवात केली. आज महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरी भागामध्ये जा, बाहेरून आलेले प्रामुख्याने उत्तर भारतीय लोक त्यांची हिंदी भाषा अगदी सहजपणे बोलतात. कारण त्यांनीच उर्वरित भारताला आमची भाषा हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असे अप्रत्यक्षपणे ठणकावून सांगितले आहे.
मराठी वर्तमानपत्रांच्या बातम्यांवर मराठी लोकांनी दिलेल्या कमेंट्स वाचताना बहुतांश लोक हिंदी ही राष्ट्रभाषा नाही असेच म्हणत होते. ही समाधानाची बाब. परंतु राष्ट्रभाषेच्या अंधश्रद्धेला अजूनही काही मराठी लोक बळी पडत आहेत. हिंदूंची भाषा हिंदी, असंही अनेकांना वाटते. ही चिंतेची गोष्ट आहे. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशाला केवळ एकच भाषा असावी, हे पूर्णपणे चुकीचे आहे. उत्तर भारतातली एकही भाषा ही अभिजात नाही. याउलट दक्षिण भारतातल्या सर्वच भाषा दीड ते दोन हजार वर्षांपासून प्रचलित आहेत. एका अर्थाने त्या समृद्ध आहेत. परंतु ही समृद्धी नष्ट करण्यासाठी उत्तर भारतातून हिंदी हळूहळू दक्षिण भारतावर अतिक्रमण करताना दिसते आहे.
आज-काल सर्वच लोक आपल्या मुलांना सीबीएसई तसेच आयसीएसई बोर्डाच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी पाठवतात. या सर्वच शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य आहे. आणि विशेष म्हणजे तिथले शिक्षक आणि विद्यार्थी देखील एकमेकांशी हिंदीमध्ये बोलतात. याच कारणास्तव मुले आपली मातृभाषा विसरत चाललेले आहेत. त्यांना मातृभाषेचे मोलदेखील राहिलेले नाही. अशीच परिस्थिती चालू राहिली तर हळूहळू पुढील काही दशकांमध्ये मराठीसह अन्य भाषा गिळंकृत करण्यास हिंदी सफल होईल. यामुळे भाषा नष्ट होऊन संस्कृती देखील लयाला जाण्याचा धोका संभवतो.
उत्तर भारत हा भारतातील सर्वात अप्रगत भाग आहे. म्हणून नोकरीच्या निमित्ताने अथवा व्यवसायासाठी इथले लोक दक्षिणेच्या दिशेने धाव घेतात. सरासरी पाहिली तर महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडून सर्वात जास्त स्थलांतर होते. परंतु या स्थलांतरातून उत्तर भारतीय लोक आपली भाषा देखील घेऊन येतात. अप्रत्यक्षपणे राष्ट्रभाषेचा स्टॅम्प लावून ती इथल्या लोकांवर लादायचा प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे मराठी लोकांना देखील याचे फारसे काही वाटत नाही. याबाबतीत तमिळ नागरिकांचा आदर्श घेण्यासारखा आहे. तमिळ ही भारतातील सर्वात प्राचीन भाषा. आणि विशेष म्हणजे इथल्या लोकांना देखील त्याचा सार्थ अभिमान आहे. आपण जर आपली भाषा सोडली तर आपली संस्कृती देखील लयाला जाईल, याची पुरेपूर जाणीव तमिळ लोकांना आहे. म्हणूनच त्यांच्या विरोधामुळेच आज हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. त्याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. परंतु ही गोष्ट मराठी भाषिक लोकांना कधी समजणार? हा मोठा प्रश्न आहे.
एखाद्याने हिंदीला विरोध केला की या लोकांच्या लेखी तो लगेचच देशद्रोही होतो. हिंदी वृत्तवाहिन्यांच्या कमेंटवर तर अश्विनला देखील हिंदी लोकांनी देशद्रोही ठरवले होते! मागच्या महिनाभरातील महाराष्ट्रात घडलेल्या घटना पाहता बाहेरून आलेले लोक सातत्याने मराठी लोकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. ही निश्चितच चिंतेची बाब आहे. राजकारणी लोकांना याचे काहीच वाटत नाही. अर्थात मराठी लोकांचा ‘कणा’ त्यांना ठाऊक आहे. शिवाय बाहेरून आलेल्या लोकांमुळे त्यांची मतपेढी देखील मजबूत होते. म्हणूनच यावर मूग गिळून गप्प बसल्याशिवाय त्यांना पर्याय उरत नाही. अशा राजकारण्यांकडून कोणतीही कृती होणे, हे मराठी माणसाला अपेक्षित नाहीच!
आजकाल उत्तर भारतीय भाषेचे महाराष्ट्रावर होणारे अतिक्रमण धोकादायक वाटत नसले तरी त्याची वळणे मात्र धोक्याच्या दिशेने जाताना दिसत आहेत. परंतु याचे आम्हा मराठ्यांना काहीच नाही, ही जास्त चिंतेची बाब. इतिहासामध्ये डोकावले तर लक्षात येते की यापूर्वीही उत्तरेतून बरीचशी स्थलांतरित महाराष्ट्रामध्ये झाली. परंतु त्या लोकांनी इथलीच भाषा आत्मसात केली. आज अमराठी आडनावे असणाऱ्या अनेक कुटुंबांची मातृभाषा मराठी आहे. परंतु इथून पुढे ही परिस्थिती राहील की नाही यात शंका वाटते. अर्थात राष्ट्रभाषा या गोंडस नावाखाली हिंदी सहजतेने आत्मसात करणाऱ्या मराठी लोकांची यामध्ये पूर्णतः चुकी आहे. याकरता भाषेविषयी प्रबोधन करण्याची अतिआवश्यकता वाटते.
आपल्या मनातील इंग्रजीच्या न्यूनगंडाला हिंदी बोलून मराठी लोक वाट करून देतात. म्हणूनच बिगरमराठी लोकांनी मराठ्यांना भाषेच्या बाबतीत गृहीत धरलेले आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये हीच परिस्थिती पाहायला मिळते. मराठी बोलीभाषेचा विचार केला तर मुंबई-नागपूर आधीच हाताबाहेर गेलेली शहरे आहेत. त्यांच्या पंक्तीमध्ये आता हळूहळू महाराष्ट्राची आयटी नागरी पुणे देखील सामील होताना दिसते. ही परिस्थिती कधी बदलेल सांगू शकत नाही. परंतु मराठी लोकांना आपली संस्कृती आणि भाषा वाचवायची असेल तर राष्ट्रभाषा या संकल्पनेला तिलांजली देणे योग्य ठरेल. आपल्या धर्म आणि जातीपेक्षा भाषेला महत्त्व दिले तरच महाराष्ट्र टिकून राहील. नाहीतर पुढच्या काही दशकांमध्ये आपल्या पिढ्या ‘हमरे को, तुमरे को’ करतच वाटचाल करताना दिसतील.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #राष्ट्रभाषा #भारतीय #भारत
Sunday, January 12, 2025
राष्ट्रभाषेचं गुणगान
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com