चित्रपटाची सुरुवात होते हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य आणि वळणावळणाच्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एका गाडीने. एक नवविवाहित जोडपे आपल्या मधुचंद्रासाठी हिमालयाच्या कुशीतील एका छोट्याशा गावाच्या दिशेने निघालेले आहे. परंतु नवीन जीवनाची सुरुवात करत असताना जो आनंद, उत्साह चेहऱ्यावर दिसायला हवा तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ‘तो’ सतत वैतागलेला, त्रासलेला आणि छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारा विक्षिप्त मनुष्य आहे. याउलट ‘ती’ मात्र शांत आणि सोज्वळ. अखेरीस दोघे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतात. हिमालयाच्या कुशीतील एका ‘होमस्टे’मध्ये त्यांच्या राहण्याची सोय केलेली असते. हा होमस्टे म्हणजे वेगवेगळ्या दरवाजांचे घातलेले एक कोडेच आहे. कुठून आत जावं आणि कुठून बाहेर यावं? हे नवीन माणसाला लवकर कळणार नाही. अशा ठिकाणी ते नवविवाहित जोडपे राहू लागते. हळूहळू एकेका प्रसंगामधून त्याचा विक्षिप्त आणि रागीट स्वभाव तिला कळायला लागतो. तिच्याशी बोलण्याऐवजी तो बहुतांश वेळ मोबाईलमधील गेममध्येच घालवत राहतो. ती देखील त्याला घाबरायला लागते. याच्यासोबत पुढील आयुष्य कसे घालवावे? हा ग्रहण प्रश्न तिला पडतो. लवकरच तिची घुसमट व्हायला लागते. परंतु तिच्याकडे त्याचे बिलकुलच लक्ष नसते. डोंगरदर्यांच्या त्या परिसरामध्ये ते फिरत असतात परंतु त्यांच्यात नवविवाहित जोडप्यासारखा कुठलाही संवाद होत नाही. अनेकदा ती एकांतामध्ये रडते देखील. तिची ही घुसमट या होमस्टेचा केअर टेकर अर्थात जो मालकाचा मुलगा देखील आहे, ‘मोहित’ पाहत असतो. त्यामुळे त्याची देखील चिडचिड होत राहते. अखेरीस दोन-तीन दिवसांनी तिने जवळच्याच एका खोल दरीमध्ये उडी मारण्याचे समजते. अर्थात यामुळे ‘तो’ हादरून जात नाही. त्या दरीमध्ये जाऊन मृतदेह खरोखर आहे की नाही, हे पाहण्याचे धाडस पोलीसदेखील करत नाहीत. आणि या घटनेला अपघाताचे नाव देऊन केस बंद केली जाते.
ही कथेची मुख्य पार्श्वभूमी. परंतु मध्यंतरानंतर कथा एका वेगळ्या वळणावर वाटचाल करू लागते. तिने खरोखर आत्महत्या केली आहे का? की तिला त्याने दरीमध्ये ढकलून दिले होते? तिचा आत्मा व भूत या ठिकाणी वावरत आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला हळूहळू मिळू लागतात.
एक वेगळ्या प्रकारची कथा असलेला हा चित्रपट “द रॅबिट हाऊस”. याचा टीझर जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा हा चित्रपट थ्रिलर किंवा भयपट प्रकारातील असावा, असे वाटले. परंतु प्रत्यक्ष चित्रपट हा निराळ्या प्रकारचा आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सुद्धा मी तो पूर्ण पाहिला नव्हता. युट्युब व्हिडिओवरील कमेंट वाचून असे समजले की, दिग्दर्शकाने पूर्ण चित्रपटच ट्रेलरमध्ये दाखवलेला आहे. खरं तर असं काही वाटत नाही. ट्रेलरमध्ये प्रत्यक्ष मध्यंतरापर्यंतचा भाग दाखवलेला आहे. संपूर्ण कथेची उलगड ही शेवटच्या काही मिनिटांमध्ये होते.
कलाकारांच्या बाबतीत सांगायचं तर सर्वांचीच कामे उत्तम झालेली आहेत. सुरुवातीची काही मिनिटे कथा संथ चालली असल्याचे दिसते. परंतु एकदा तिने वेग पकडला की, आपण देखील त्यामध्ये गुंतत राहतो. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण हातातील कॅमेराने केले आहे, असे जाणवते. कदाचित ती कथेची गरज असावी. आणि त्याचमुळे विविध दृश्यांमध्ये परिणामकारकता जाणवते. पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शनदेखील उत्तम झालेले आहे. असे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहिले तरच उत्तम.
— तुषार भ. कुटे
Wednesday, January 8, 2025
द रॅबिट हाऊस
Subscribe to:
Post Comments (Atom)
वाह! खूप छान! धन्यवाद.
ReplyDeleteGreat!
ReplyDelete