मराठी भाषेतील शिक्षण म्हणजे अतिशय फालतू आणि दुय्यम दर्जाचं, अशा अंधश्रद्धा मागच्या काही वर्षांपासून वेगाने फोफावत आहेत. आणि आता शासकीय यंत्रणा देखील त्याला पद्धतशीरपणे खतपाणी घालताना दिसत आहेत. पैशावाल्याचं पोरग इंग्रजीतून शिकणार आणि गरिबाचं पोरगं मराठीतून शिकणार, ही समाजाची मानसिकता बनत चाललेली आहे. मातृभाषेतील शिक्षण केव्हाही श्रेष्ठच जे हृदयापर्यंत भिडतं असं जवळपास प्रत्येक भाषा तज्ञाचे मत आहे. परंतु आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही. वारेमात पैसा ओतून मिळवलेलं सीबीएसईतील इंग्रजी भाषेतील शिक्षण म्हणजेच श्रेष्ठ, असं अनेकांना वाटतं. त्यातूनच आता महानगरपालिका देखील तथाकथित गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेतलं सीबीएससीतल शिक्षण देण्यासाठी सज्ज होत आहेत.
या शाळांमध्ये आता क्रीडा कक्ष, संगीत खोली, इलेक्ट्रिक खोली, नृत्य कला, हस्तकला, सामान्य विज्ञान, जीवशास्त्र भौतिकशास्त्र, संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय अशा सुविधा महानगरपालिका करून देणार आहे. अशा वेळी एक प्रश्न पडतो की, या शाळा सध्याच्या मराठी शाळांमध्ये त्यांना देता येत नाहीत का? ज्यांनी कोणी या निर्णयासाठी हातभार लावला असेल ते सर्वच जण आपल्या मातृभाषेतून शिकलेले असावेत, याची मला शंभर टक्के खात्री आहे. पण तरी देखील नवीन पिढीला इंग्रजीतून शिकण्याचा हट्टहास का? हा गहण प्रश्न आहे. इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. ज्यांची सांगड आपल्या समाजाला कदाचित अजूनही घालता येत नाही. त्यातूनच शासकीय यंत्रणांची देखील अशी भयानक मानसिकता तयार होते. एखाद्या परकीय भाषेतून शिक्षण घेणं किती अवघड असतं तेही अतिशय लहान मुलाला… याची कल्पना कदाचित महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याला नसावी. मातृभाषेतूनच उत्तम शिक्षण दिलं, इंग्रजीचेही धडे दिले तर मूल चांगली प्रगती करू शकेल. परंतु याचा विचार कोणालाही करायचा नाही. स्वतःची उदो उदो करण्याच्या नादात शिक्षण क्षेत्राचे वाटोळं करायला बहुतांश मंडळी टपलेली आहेत असंच दिसतं. मागील बऱ्याच वर्षांपासून अनेक पालकांनी इंग्रजीतून शिक्षण अतिशय अवघड जातं म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांमध्ये टाकल्याची असंख्य उदाहरणे आहेत. या मागची नक्की कारणे काय? याचे उत्तर महानगरपालिकेच्या तथाकथित शिक्षण तज्ञांनी घ्यायला हवीत. त्यावर विचार करायला हवा. आत्ताची शिक्षणयंत्रणा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन व्हायला हवे. मराठी शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात? शिवाय त्यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे? याचा विचार व्हायला हवा. जर मराठी भाषेतूनच शिक्षकांना समस्या असतील तर इंग्रजीतून काय होणार? या प्रश्नाचे देखील उत्तर शोधायला हवे. शाळा इंग्रजी केली आणि सीबीएससी बोर्डाला जोडली की शिक्षण दर्जेदार होत नाही. फक्त स्वतःचा उदो उदो होतो. यातून महानगरपालिका काही शिकेल, याची सध्यातरी शाश्वती वाटत नाही.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #शिक्षण #इंग्रजी #मातृभाषा
Sunday, February 2, 2025
सीबीएसई आणि महानगरपालिका
Saturday, February 1, 2025
जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं
प्रत्येक शतकाचा कालखंड हा वेगवेगळ्या घटनांनी तसेच निरनिराळ्या साम्राज्यांच्या इतिहासकथांनी व्यापलेला आहे. या प्रत्येक कालखंडामध्ये निरनिराळ्या देशांनी, संस्कृतींनी आपला ठसा उमटवला. कोणताच एक देश अथवा खंड सातत्याने जगावर राज्य गाजवू शकला नाही किंवा तेथील साम्राज्यांनी वाटसरुंनी अथवा बुद्धिमंत्तांनी देखील सातत्याने एकाच प्रदेशातून प्रगती केली नाही. आज जरी युरोप-अमेरिकासारखे खंड प्रगतीच्या वाटेवर पहिल्या स्थानावर असले तरी कोणी एकेकाळी आशिया खंड म्हणजे जगाच्या समृद्धीचा आणि भरभराटीचा प्रदेश होता. त्याचीच गोष्ट सांगणारा हा ग्रंथ म्हणजे डॉ. स्टुअर्ट गार्डन लिखित ‘जेव्हा आशिया म्हणजेच जग होतं’.
माध्यमिक शिक्षणामध्ये इतिहासाच्या पुस्तकांमधून मध्ययुगीन मला जगाचं दर्शन झालं. यात अनेक प्रवासी आणि साम्राज्याची माहिती होती. परंतु ती त्रोटक आणि तुरळकच. उदाहरण घ्यायचं झालं तर चिनी प्रवासी फहियान आणि ह्युएनत्संग यांचे देता येईल. ह्युएनत्संग याने प्रवासाचा भला मोठा टप्पा गाठत भारत भ्रमंती केली होती. अनेक ठिकाणी भेटी देऊन नोंदी केल्या होत्या. यातून तत्कालीन भारत व इथली राज्यव्यवस्था कशी होती याची माहिती मिळते. इसवी सन ५०० ते १५०० या कालखंडामध्ये आशिया हा एक विस्मयजनक एकसंध आणि विविध शोधांनी गजबजलेला होता! जगभरातील पाच मोठी शहरे ही इथल्या पाच वेगवेगळ्या साम्राज्यांच्या राजधान्या होत्या. समृद्धी आणि भरभराटी याचेच दुसरे नाव म्हणजे आशिया खंड होते. भारतीय आणि चिनी संस्कृती तसेच अरब जगत याच्या केंद्रस्थानी होते. याच काळामध्ये गणिताची, भूमितीची आणि विज्ञानाच्या विविध शाखांची प्रगती आशिया खंडातून होत गेली. अनेक तत्त्वज्ञाने, विचारधारा तयार झाल्या. साहसी वाटसरूंनी, प्रवाशांनी जग धुंडाळले आणि यातूनच विचारधारांचा प्रसार विविध देशांमध्ये होत गेला. या कालखंडात जीवन व्यतीत केलेल्या माणसांच्या संशोधनावर प्रत्येक प्रकरण आधारित आहे. ह्युएनत्संग, इब्न फदलान, इब्न सीना, इब्न बतुता, मा हुआन, बाबर, टोमे पिरेस अशा विविध व्यक्तींच्या चित्रणातून हे पुस्तक क्रमाक्रमाने साकारलेले आहे. यातील बहुतांश जणांची चरित्रे ही प्रेरणादायी आणि आशा-आकांक्षांनी भरलेली आहेत, ज्यामुळे आपण वाचताना आश्चर्यचकित होऊन जातो!
--- तुषार भ. कुटे
#मराठी #पुस्तक #इतिहास #परीक्षण #पुस्तक_परीक्षण
साहित्यिकांची वंशज आणि इंग्रजी
मागच्या आठवड्यामध्ये बहुतांश मराठी वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. मराठीतील एका सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या वंशजाने लहान वयातच स्वतःचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित केला. आणि त्याचे भरभरून कौतुक अनेक मान्यवरांकडून करण्यात आले होते. ही बातमी वाचून अतिशय वाईट वाटले. आपल्या मराठी भाषेला ज्यांनी समृद्ध केले त्यांचेच वंशज आता इंग्रजीची कास धरण्यास व्यस्त होत आहेत. मायबोलीची वाट सोडून स्वतःला ग्लोबल सिद्ध करण्यासाठी आंग्लभाषेची गोडवी गात आहेत. ही बाब कोणत्याही मराठीप्रेमीसाठी निश्चितच राग आणणारी आहे. अनेकांना वाटतं की, आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत असली तरी आम्ही त्यांच्याशी मराठीत बोलतो म्हणजे आपल्या भाषेचा ऱ्हास होणार नाही. ही बाब कितपत सत्य मानायची? हे वरील उदाहरणावरून लक्षात येईलच. या भाषेमध्ये आपण बोलतो त्याच भाषेतील ज्ञान आपल्याला व्यवस्थित समजते, हृदयापर्यंत जाते. परंतु परकीय भाषेतून शिकल्यानंतर स्वभाषेचा कितपत आपण विचार करतो? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. इंग्रजीतून शिकत असलेल्या ९९% मुलांना मराठी भाषेचे काहीही घेणे देणे नाही. हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे स्वतःचं स्टेटस वाढवण्याच्या नादात, स्वतःला ‘ग्लोबल सिटीझन’ सिद्ध करण्याच्या नादात आणि ‘इंग्रजीशिवाय काही खरं नाही’ या अंधश्रद्धेपोटी आपण मराठी भाषेचा आणखी वेगाने ऱ्हास करू, हे मात्र निश्चित.
--- तुषार भ. कुटे
#मराठी #शिक्षण #marathi