Sunday, February 2, 2025

सीबीएसई आणि महानगरपालिका

मराठी भाषेतील शिक्षण म्हणजे अतिशय फालतू आणि दुय्यम दर्जाचं, अशा अंधश्रद्धा मागच्या काही वर्षांपासून वेगाने फोफावत आहेत. आणि आता शासकीय यंत्रणा देखील त्याला पद्धतशीरपणे खतपाणी घालताना दिसत आहेत. पैशावाल्याचं पोरग इंग्रजीतून शिकणार आणि गरिबाचं पोरगं मराठीतून शिकणार, ही समाजाची मानसिकता बनत चाललेली आहे. मातृभाषेतील शिक्षण केव्हाही श्रेष्ठच जे हृदयापर्यंत भिडतं असं जवळपास प्रत्येक भाषा तज्ञाचे मत आहे. परंतु आम्हाला त्याचं काहीही घेणं देणं नाही. वारेमात पैसा ओतून मिळवलेलं सीबीएसईतील इंग्रजी भाषेतील शिक्षण म्हणजेच श्रेष्ठ, असं अनेकांना वाटतं. त्यातूनच आता महानगरपालिका देखील तथाकथित गरीब मुलांसाठी इंग्रजी भाषेतलं सीबीएससीतल शिक्षण देण्यासाठी सज्ज होत आहेत.
या शाळांमध्ये आता क्रीडा कक्ष, संगीत खोली, इलेक्ट्रिक खोली, नृत्य कला, हस्तकला, सामान्य विज्ञान, जीवशास्त्र भौतिकशास्त्र, संगणक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय अशा सुविधा महानगरपालिका करून देणार आहे. अशा वेळी एक प्रश्न पडतो की, या शाळा सध्याच्या मराठी शाळांमध्ये त्यांना देता येत नाहीत का? ज्यांनी कोणी या निर्णयासाठी हातभार लावला असेल ते सर्वच जण आपल्या मातृभाषेतून शिकलेले असावेत, याची मला शंभर टक्के खात्री आहे. पण तरी देखील नवीन पिढीला इंग्रजीतून शिकण्याचा हट्टहास का? हा गहण प्रश्न आहे. इंग्रजीतून शिकणं आणि इंग्रजी शिकणं या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत. ज्यांची सांगड आपल्या समाजाला कदाचित अजूनही घालता येत नाही. त्यातूनच शासकीय यंत्रणांची देखील अशी भयानक मानसिकता तयार होते. एखाद्या परकीय भाषेतून शिक्षण घेणं किती अवघड असतं तेही अतिशय लहान मुलाला…  याची कल्पना कदाचित महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याला नसावी. मातृभाषेतूनच उत्तम शिक्षण दिलं, इंग्रजीचेही धडे दिले तर मूल चांगली प्रगती करू शकेल. परंतु याचा विचार कोणालाही करायचा नाही. स्वतःची उदो उदो करण्याच्या नादात शिक्षण क्षेत्राचे वाटोळं करायला बहुतांश मंडळी टपलेली आहेत असंच दिसतं. मागील बऱ्याच वर्षांपासून अनेक पालकांनी इंग्रजीतून शिक्षण अतिशय अवघड जातं म्हणून आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांमध्ये टाकल्याची असंख्य उदाहरणे आहेत. या मागची नक्की कारणे काय? याचे उत्तर महानगरपालिकेच्या तथाकथित शिक्षण तज्ञांनी घ्यायला हवीत. त्यावर विचार करायला हवा. आत्ताची शिक्षणयंत्रणा सुधारण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, उपाययोजना करता येतील यावर विचारमंथन व्हायला हवे. मराठी शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने शिकवतात? शिवाय त्यांना कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे? याचा विचार व्हायला हवा. जर मराठी भाषेतूनच शिक्षकांना समस्या असतील तर इंग्रजीतून काय होणार? या प्रश्नाचे देखील उत्तर शोधायला हवे. शाळा इंग्रजी केली आणि सीबीएससी बोर्डाला जोडली की शिक्षण दर्जेदार होत नाही. फक्त स्वतःचा उदो उदो होतो. यातून महानगरपालिका काही शिकेल, याची सध्यातरी शाश्वती वाटत नाही.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #शिक्षण #इंग्रजी #मातृभाषा

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com