Saturday, February 8, 2025

मातृभाषा बदलण्याचे फॅड

इतिहास असं सांगतो की प्रत्येक भाषेला स्वतःची किंमत असते. किंबहुना ती किंमत ती भाषा बोलणाऱ्यांनी ठरवलेली असते. कधीतरी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. मागील दोन हजार वर्षांच्या भाषिक इतिहासामध्ये डोकावलं की कळतं की प्रांताप्रांतागणित भाषा बदलत गेल्या. एका भाषेवर दुसऱ्या भाषेचा प्रभाव दिसून आला. शिवाय भाषांमधील आदान प्रदान देखील होत गेले. विविध भाषिकांच्या मानसिकतेमुळे काही भाषा लयास गेल्या. आणि या पुढील काळात देखील त्या जाऊ लागतील. दुसरी भाषा आपल्यापेक्षा श्रेष्ठ. आणि ती बोलली की आपल्याला भरपूर पैसा मिळेल मान मिळेल अशी अनेकांची समजूत असते. यातूनच भाषेचा ऱ्हास व्हायला सुरुवात होते. आज भारतीय समाजाची मानसिकता बघितली तर याची उत्तम प्रचिती येईल अशी परिस्थिती आहे.
मातृभाषेतील शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण हे सर्वांनाच माहित आहे. पण जेव्हा मातृभाषेचे स्टेटस कमी होतं तेव्हा ती भाषा बोलणाऱ्यांचं स्टेटस देखील त्यांच्या मनात कमी होत असतं. अर्थात ही गोष्ट आपल्या मराठी भाषेला देखील लागू आहे. ज्ञानेश्वरांसारख्या महान प्रज्ञावंताची, शिवरायांसारख्या महान योद्धाची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अद्वितीय व्यक्तीची भाषा म्हणजे मराठी. लोकसंख्येची आकडेवारी पाहिली तर मराठी भाषिकांची संख्या वाढते आहे. परंतु मराठीवर प्रेम करणाऱ्या आणि खरोखर मराठीमध्ये बोलणाऱ्यांची संख्या वाढते आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे वाटते.
इंटरनेट युगाचा प्रारंभ झाल्यानंतर इंग्रजी वेगाने वाढायला लागली. कारण तंत्रज्ञानाचे ज्ञान हे इंग्रजीमध्येच उपलब्ध होते. संगणकाची भाषा देखील इंग्रजी होती. आणि याच कारणास्तव इंग्रजीचे भारतातील महत्त्व देखील वाढू लागलं. इंग्रजांनी भारतावर राज्य केलं त्या काळात देखील इंग्रजीचं जितकं महत्त्व होतं त्यापेक्षा कित्येक पटीने अधिक महत्त्व आज भारतामध्ये आहे. त्याचे कारण हेच. मातृभाषेतील मातृभाषेतून शिक्षण घेतलेले ९० टक्क्यांवर अधिक लोक इंग्रजी भाषेशी संबंधित व्यवसायामध्ये आज आहेत. त्यांना वाटतं इथून पुढे आता इंग्रजीत चालणार. पण आमची भाषा तर मराठी. मग आमचा वंश जगाच्या स्पर्धेत कसा टिकू शकतो? या प्रश्नाचे उत्तर नवमराठी पालक स्वतःच्या पद्धतीने शोधताना दिसत आहेत.
पुण्यामधल्या एका उद्यानामध्ये काही लहान मुले खेळत होती. त्यांना बघून जवळूनच आपल्या आई-वडिलांसोबत चालणारी एक छोटी मुलगी पळत आली. आणि तिने इंग्रजीमध्ये विचारले, ‘मी तुमच्याबरोबर खेळू का?’ मुलांना इंग्रजीतल्या त्या वाक्याचा अर्थ समजला नाही. तिने वेगळ्या पद्धतीने विचारले. ही मुलगी कुठल्या ग्रहावरून आली आहे? अशा पद्धतीचे भाव त्या मुलांच्या चेहऱ्यावर होते. तिचा अट्टाहास पाहून मुले तिथून पळून गेली. त्या मुलीच्या चेहऱ्यावर नाराजीची एक छोटीशी छटा दिसून आली. तिचे आई-वडील तिला घेऊन गेले. तेही तिच्याशी इंग्रजीतच बोलत होते. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की दोघेही आई-वडील एकमेकांशी मराठीमध्ये बोलताना दिसले. कदाचित मुलीला आपल्या आई-वडिलांच्या मातृभाषेचा अर्थात मराठीचा काहीच गंध नसावा. म्हणजे लहानपणापासूनच ते तिच्याशी फक्त इंग्रजीत बोलत असावेत असं दिसलं. शेवटपर्यंत मी त्यांचं निरीक्षण करत होतो. ती मुलगी एकही शब्द मराठीमध्ये बोलली नाही. तेव्हा माझा समज पक्का झाला.
मागे एकदा एक आजी आजोबा भेटले होते. ते आपल्या नातीबद्दल अतिशय उत्साहाने बोलत होते. आमच्या मुलीला मराठी बोलता येत नाही बरं का! असं अभिमानाने सांगत होते. खरंतर ही अभिमानाची नाही तर लाज वाटण्याची गोष्ट आहे, असं आम्ही मनातल्या मनात म्हटलं. आजी-आजोबांना याचा देखील अप्रूप वाटत होतं की आम्हाला तिच्याशी बोलण्यासाठी इंग्रजीचा वापर करावा लागतो. एकंदरीत याही मुलीची परिस्थिती पहिल्या मुलीसारखी होती. लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या मातृभाषेपासून दूर ठेवायचं म्हणजे त्यांची मातृभाषा आपोआपच इंग्रजी होईल, असं काहीसं गणित.
यामध्ये आणखी एक गंमत मला विशेषत्वाने आढळून आली. आई वडील दोघेही मराठी परंतु मुलगी त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलते. ही गोष्ट अधिक हास्यास्पद वाटत होती. नंतर त्याचं कारण देखील समजलं. दोघांना फारसं इंग्रजी बोलता येत नाही. पण आपल्या मुलीला मोठ्या इंग्रजी शाळेत घातले. त्यामुळे मराठी सारखी गावठी भाषा बोलून कसं चालेल? असा विचार करून इंग्रजी येत नसल्याने ते तिच्याशी बिहारची राज्यभाषा असणाऱ्या हिंदीमध्ये बोलत होते. कधी कधी अशा गोष्टी देखील चिड आणतात. विशेष म्हणजे मुलाच्या शाळेमध्ये देखील शिक्षक त्यांच्याशी हिंदीमध्येच बोलायचे. मला इथे हिंदी आणि मराठी भाषेचं तुलना करायची नाही. पण एकंदरीत इतिहास बघितला तर समृद्धी कोणाच्या वाटेला आहे, हे तुम्हाला देखील समजेल. कोणती भाषा कोणत्या प्रकारच्या प्रांताची आहे? या प्रश्नाचे उत्तर देखील आपल्याला शोधता येईल.
सांगायचं तात्पर्य असं की नवपालक आपल्या मुलाला ‘ग्लोबल सिटीझन’ करायच्या नादात आपल्या मातृभाषेला तुच्छ लेखत आहेत, याची वारंवार प्रचिती येते. इंग्रजी भाषा शिकल्याने प्रगती होते हे खर आहे. पण त्यासाठी आपली मातृभाषा बदलण्याचं जे फॅड आज दिसतय, ते खरोखर हास्यास्पद असंच आहे.

— तुषार भ. कुटे


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com