ऐतिहासिक कालखंडामध्ये जितके आपण मागे जात राहतो तितके पुरावे क्षीण आणि दुर्बल होऊन जातात. मग अशा इतिहासाची मांडणी करताना संशोधकांचा कस लागतो. यातून नवनव्या संशोधनपद्धती विकसित होतात. तर्कपद्धतीचा अवलंब केला जातो. आणि इतिहासाची मांडणी होते. भारतीयांचा ज्ञात इतिहास अडीच हजार वर्षांपासून सुरू होतो. बौद्ध-जैन धर्माचा उदय आणि मौर्य साम्राज्याची स्थापना इथून भारतीय इतिहास सुरू होतो, असे म्हणतात. परंतु भारतामध्ये पहिल्या बुद्धिमान मानवाचे अर्थात होमो सेपियन्सचे आगमन सुमारे ६५ हजार वर्षांपूर्वी झाले होते. मग या उरलेल्या ६२ हजार पाचशे वर्षांमध्ये नक्की काय झाले? याचा शोध घ्यायचा असल्यास आज उपलब्ध असलेल्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करता येऊ शकतो.
अनुवंशशास्त्राच्या आधारे वानरांच्या प्रजातीतून विकसित होत असलेला किंबहुना झालेला बुद्धिमान मानव अर्थात होमो सेपियन्स आफ्रिकेतून हळूहळू बाहेर पडला, हे सिद्ध झालेले आहे. विविध मार्गांचा अवलंब करून जगाच्या इतरत्र भागामध्ये पोहोचत गेला. डार्विनपासून सुरू झालेला हा प्रवाह पुढील कित्येक दशके अनेक अनुवंशशास्त्रज्ञांनी पुढे प्रवाहित ठेवला. यातून नवनवे विचार, संशोधन पुढे आले. इतिहास उमजत गेला. तर्कवितर्क लढवले गेले. पारंपारिक समजुतींना तडे देखील बसले. परंपराच्या विरोधात संशोधनांचे तात्पर्य आल्यामुळे वादविवाद देखील झाले. परंतु संशोधकांनी सत्य शोधण्याचा आटोकात प्रयत्न केला. आजही विज्ञानाच्या आधारे सिद्ध होत असलेल्या अनेक संकल्पनांना परंपराधिष्टीत लोकांचा विरोध आहे. त्यातीलच अनेक प्रश्नांची उत्तरे टोनी जोसेफ यांनी ‘अर्ली इंडियन्स’ या पुस्तकांमध्ये विज्ञानाचा आधार घेत स्पष्टपणे मांडलेली आहेत.
एकेकाळी भारतामध्ये जगातील सर्वात प्रगत संस्कृतींपैकी एक संस्कृती आनंदाने नांदत होती. ती म्हणजे ‘हडप्पा संस्कृती’. अनेक अनुवंशशास्त्रज्ञ, पुरातत्त्ववेत्ते यांनी हडप्पावर सखोल संशोधन केले आहे. त्यातून विविध निष्कर्ष देखील काढलेले आहेत. भारतातील ही प्राचीन संस्कृती भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने पाया होती. हे देखील त्यांनी सिद्ध केले आहे. किंबहुना यावर सर्वांचेच एकमत असल्याचे दिसते. हजारो वर्षे गुण्यागोविंदाने नांदल्यानंतर हळूहळू हडप्पा संस्कृती लयास गेली. आणि भारतातील इतर भागांमध्ये संचारत गेली. हडप्पा विकसित होण्याच्या आधीदेखील भारतामध्ये मानव संस्कृती नांदत होत्या. पण हडप्पा संस्कृती ही मैचा दगड ठरली.
इराणच्या झेग्रोस परिसरातून आर्यवंशीय लोकांचे भारतामध्ये स्थलांतर झाले आणि यानंतरच हळूहळू हडप्पा संस्कृती लयाला गेली, असे म्हटले जाते. या ऐतिहासिक संकल्पनेचे विस्तृत विवेचन टोनी जोसेफ यांनी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून या पुस्तकामध्ये मांडलेले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच जीनोम म्हणजे काय, याची विस्तृत स्पष्टीकरण वैज्ञानिक संकल्पनांच्या आधारे त्यांनी दिलेले आहे. ते अगदी बारकाईने वाचावे लागते. कधी कधी काही गोष्टी डोक्यावरून देखील जाऊ शकतात. परंतु तात्पर्याने डीएनएच्या आधारे एखाद्या मानवी समूहाचा वंश काढता येऊ शकतो, असं टोनी जोसेफ यांनी सिद्ध केले आहे.
या पुढील प्रकरणामध्ये भारताच्या विविध भागांमध्ये सापडलेल्या मानवी अवशेषांचा अभ्यास करून येथे मानवाचा वावर किती प्राचीन होता, याचे विस्तृत विवेचन वाचायला मिळते. पुस्तकाच्या जवळपास निम्म्या भागामध्ये हडप्पा संस्कृती वरील विस्तृत संशोधन लेखकाने मांडलेले आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये सापडलेल्या हडप्पा, मोहेंजोदारो, राखीघडी, धोलाविरा, कालीबंगन, मेहरगड अशा विविध स्थळांचा अभ्यास केलेला दिसतो. या ठिकाणी सापडलेल्या वस्तूंद्वारे त्या काळाची संस्कृती कशी होती, तसेच त्यांचा अन्य भागांशी व्यापार कशा पद्धतीने होत होता? याची देखील माहिती मिळते. तत्कालीन भौगोलिक रचनेचा तसेच वातावरणाचा अभ्यास करून हडप्पा संस्कृतीची एकंदरीत प्रगती लेखकाने मांडलेली आहे. काही गोष्टी तर्काच्या आधाराने तर काही विज्ञानाने सिद्ध केलेल्या दिसतात. भारतामध्ये सध्या वापरात असलेल्या चार प्रकारच्या भाषांपैकी इंडो-युरोपियन आणि द्रविडी भाषांमधील फरक अथवा साम्य तसेच हडप्पा लिपी आणि द्रविडी लिपी मधील साम्य यावरून विविध तर्क लेखकाने येथे विस्तृतपणे मांडलेले आहेत. हडप्पाची लिपी आजही कोणत्याही संशोधकाला वाचता आलेली नाही. अनेक संशोधकांनी आपल्या हयातीत बरेच परिश्रम करून देखील त्यांना हडप्पा चित्रलिपीचा अर्थ लावता आलेला नाही. कदाचित हडप्पाचा बहुतांश इतिहास हे चित्रलिपी वाचला वाचता आल्यानंतरच उर्वरित जगाला समजेल, असे दिसते. म्हणजेच एका अर्थाने अजूनही हडप्पाकालीन भारतीयांचा परिपूर्ण इतिहास आपल्याला ज्ञात नाहीच.
जनुकशास्त्राचा आणि रसायनशास्त्राचा आधार घेऊन लेखकाने हडप्पा संस्कृतीतील लोकांविषयी विविध तर्क मांडलेले आहेत. शिवाय आर्य खरोखर भारताबाहेरून भारतामध्ये आले होते का? याचे देखील सविस्तरपणे स्पष्टीकरण दिलेले आहे. उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय यांच्यातील जनुकीय फरक देखील यात मांडलेला दिसतो.
सरस्वती नदीची गोष्ट आणि हडप्पाकालीन चित्रलिपी याविषयी बहुतांश इतिहास अभ्यासकांना उत्सुकता असते. ही उत्सुकता शमवण्याचे काम देखील पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये होते. एकंदरीत सव्वादोनशे पानांचे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने केलेला विस्तृत अभ्यास हा वाखाणण्याजोगा आहे. भारतीय इतिहासाला एक वेगळी दृष्टी देणारे हे पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो.
— तुषार भ. कुटे
#मराठी #पुस्तक #परीक्षण #पुस्तक_परीक्षण
Saturday, February 8, 2025
अर्ली इंडियन्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment
to: tushar.kute@gmail.com