Tuesday, February 4, 2025

हो चि मिन्ह

विसाव्या शतकामध्ये देशादेशांमधील लढायात अनेक घटना घडल्या. जगामध्ये दोन महायुद्ध झाली. परंतु कोणत्याही महायुद्धामध्ये थेट सहभाग न घेतल्याने अमेरिका प्रगतीच्या पायऱ्या चढू लागली, असं म्हणतात. हळूहळू त्यांना वर्चस्वाची नशा चढू लागली. आणि याच कारणास्तव बहुतांश देशांवर राज्य करण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. परंतु अन्य देशांवर हल्ला करत असताना काही देशांनी अमेरिकेला देखील जेरीस आणले होते. त्यातील पहिला देश म्हणजे क्युबा आणि दुसरा व्हिएटनाम. व्हिएटनाम या देशाने गनिमी कावा अर्थात गुरिल्लावॉरचे तंत्र छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतले, असे अनेक लेखक लिहितात. याविषयी निश्चित माहिती नाही. पण या तंत्राचा वापर करून व्हिएटनामने अमेरिका सारख्या देशाला देखील नमवले, हे ऐतिहासिक तथ्य आहे. अर्थात यामागे भक्कम नेतृत्वाचा पाठिंबा होता, हे सत्य देखील नाकारायला नको.
आजच्या व्हिएटनामचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे हो चि मिन्ह यांचे हे छोटेखाणी चरित्रात्मक पुस्तक. याद्वारे हो चि मिन्ह यांच्या एकंदरीत कारकीर्दीचा अंदाज बांधता येऊ शकतो. एकेकाळी इंडोचायना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशियाई भागामध्ये व्हिएटनामची शेजारच्या प्रबळ देशांकडून गळचेपी होत होती. अर्थातच मागील शतकामध्ये सातत्याने स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या शेकडो देशांपैकी व्हिएटनाम हा देखील एक देश होता. अर्थात स्वातंत्र्याच्या दृष्टीने पाऊले टाकत असताना लोक चळवळ होणे अत्यंत गरजेचे होते. याच लोक चळवळीतून व्हिएटनाममध्ये राष्ट्रप्रेमी युवकाचा उदय झाला. त्यानेच विविध मार्गांचा अवलंब करत देशवासियांना एकत्र केले आणि. नवा व्हिएटनाम उभारला. शिवाय इंडोचायना मधील आपल्या जवळच्या कंबोडिया आणि लाओस या देशांमध्ये देखील समविचारी सरकारे सत्तेत आणली. त्याचीही गोष्ट या पुस्तकामध्ये वाचता येते.

--- तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #पुस्तक_परीक्षण


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com