Wednesday, February 12, 2025

जिज्ञासा

संगणक तंत्रज्ञानाची पुढची आणि सर्वात अद्ययावत पायरी म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान होय. मागच्या दशकातच या तंत्रज्ञानाने जगावर पाय रोवायला सुरुवात केली आणि आज ते सर्वच क्षेत्रांमध्ये अधिराज्य गाजवायला सज्ज झालेले आहे. अर्थात यातून कलाक्षेत्र देखील सुटलेले नाही. सृजनशीलता हा मानवाचा पायाभूत गुण आहे. परंतु हा गुणसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेने हळूहळू आत्मसात करायला घेतल्याचे दिसते. याच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मराठीमध्ये लिहिले गेलेले हे पहिलेच पुस्तक, “जिज्ञासा”.
तंत्रज्ञान म्हणजे इंग्रजी. हेच समीकरण सर्वांना पक्के ठाऊक असते. परंतु आज तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकंदरीत माहिती दळणवळणामध्ये ४०% देखील इंग्रजीचा वापर होत नाही. अर्थात उरलेल्या ६० टक्क्यांमध्ये जगातील जवळपास सर्व भाषा येतात. यामध्ये मराठी देखील आलीच. कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीमध्ये आपल्याला माहिती देऊ शकते किंवा तयार करू शकते याचा उत्तम नमुना या पुस्तकाद्वारे आपल्याला वाचायला मिळतो. संपादक विनोद शिंदे यांनी संगणकाच्या या कृत्रिम मेंदूचा वापर करून या पुस्तकात सर्वच क्षेत्रातील विविधअंगी माहिती सुटसुटीतपणे दिलेली आहे. यातून या तंत्रज्ञानाचा एकंदरीत आवाका आपल्याला ध्यानात येईल. पहिलाच लेख रतन टाटा यांच्यावर लिहिलेला आहे. मराठी भाषा, शेअर मार्केट, मोबाईल तंत्रज्ञान, कॉर्पोरेट जग, जीवनशैली, राजकारण, लोककला, मनोरंजन, महिला सुरक्षा, तणावमुक्ती, हवामान, ऑटोमोबाईल उद्योग, समाजमाध्यमे, विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, चालू घडामोडी, प्रेमकथा अशा निरनिराळ्या विषयांवर याद्वारे लिहिलेले लेख आपल्याला इथे वाचता येतात. विशेष म्हणजे ते कृत्रिमरीत्या लिहिले गेले असले तरी त्यात कृत्रिमपणा मात्र अजिबात जाणवत नाही. यातूनच या तंत्रज्ञानाची कमाल आपल्याला ध्यानात येऊ शकते.. विशेष म्हणजे एआयने लिहिलेल्या काही कविता देखील या पुस्तकाच्या शेवटी आपण वाचू शकतो. त्यामध्ये इंटरनेटद्वारेच पायरसी शोधण्याचा प्रयत्न केला तर ती जवळपास ०% येईल! अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आता उत्तम कृत्रिम सर्जनशीलता देखील होऊ लागलेली आहे, असं दिसतं! हे पुस्तक म्हणजे मानवजातीला एक उत्तम धडा आहे. याद्वारे प्रत्येक कामासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे पर्याय आहे… हे ठामपणे आपल्याला दिसून येते.
अशा विविध विषयांची आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे मराठी वाचकांना ओळख करून दिल्याबद्दल संपादक विनोद शिंदे यांचे विशेष आभार. किमान एकदा तरी या पुस्तकातील मजकूर प्रत्येकाने वाचायलाच हवा, असा आहे!

— तुषार भ. कुटे

#मराठी #पुस्तक #परीक्षण #तंत्रज्ञान #कृत्रिम_बुद्धिमत्ता



No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com