Saturday, February 1, 2025

साहित्यिकांची वंशज आणि इंग्रजी

मागच्या आठवड्यामध्ये बहुतांश मराठी वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. मराठीतील एका सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या वंशजाने लहान वयातच स्वतःचा इंग्रजी काव्यसंग्रह प्रकाशित केला. आणि त्याचे भरभरून कौतुक अनेक मान्यवरांकडून करण्यात आले होते. ही बातमी वाचून अतिशय वाईट वाटले. आपल्या मराठी भाषेला ज्यांनी समृद्ध केले त्यांचेच वंशज आता इंग्रजीची कास धरण्यास व्यस्त होत आहेत. मायबोलीची वाट सोडून स्वतःला ग्लोबल सिद्ध करण्यासाठी आंग्लभाषेची गोडवी गात आहेत. ही बाब कोणत्याही मराठीप्रेमीसाठी निश्चितच  राग आणणारी आहे. अनेकांना वाटतं की, आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत असली तरी आम्ही त्यांच्याशी मराठीत बोलतो म्हणजे आपल्या भाषेचा ऱ्हास होणार नाही. ही बाब कितपत सत्य मानायची? हे वरील उदाहरणावरून लक्षात येईलच. या भाषेमध्ये आपण बोलतो त्याच भाषेतील ज्ञान आपल्याला व्यवस्थित समजते, हृदयापर्यंत जाते. परंतु परकीय भाषेतून शिकल्यानंतर स्वभाषेचा कितपत आपण विचार करतो? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. इंग्रजीतून शिकत असलेल्या ९९% मुलांना मराठी भाषेचे काहीही घेणे देणे नाही. हे वैश्विक सत्य आहे. त्यामुळे स्वतःचं स्टेटस वाढवण्याच्या नादात, स्वतःला ‘ग्लोबल सिटीझन’ सिद्ध करण्याच्या नादात आणि ‘इंग्रजीशिवाय काही खरं नाही’ या अंधश्रद्धेपोटी आपण मराठी भाषेचा आणखी वेगाने ऱ्हास करू, हे मात्र निश्चित.

--- तुषार भ. कुटे


#मराठी #शिक्षण #marathi 




1 comment:

to: tushar.kute@gmail.com