Sunday, March 2, 2025

केशव पण्डितकृत राजाराम चरित्रम् अर्थात जिंजीचा प्रवास

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरचा काळ स्वराज्यासाठी अतिशय अवघड असा काळ होता. परंतु संभाजी महाराजांनी तत्कालीन परिस्थिती व्यवस्थित हाताळल्यामुळे स्वराज्याची वाताहत झाली नाही. पुन्हा अशीच परिस्थिती इसवी सन १६८९ मध्ये तयार झाली होती. छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या तावडीत सापडले. औरंगजेबाच्या छावणीमध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांची हत्या घडवण्यात आली. उत्तरेकडून दक्षिणेत उतरल्यानंतर औरंगजेबाने मराठ्यांचे राज्य बुडवायचेच, असा निर्धार केला होता. संभाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारखान याने रायगडाला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य बुडणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. परंतु महाराणी येसूबाई यांनी स्वराज्यातील सहकाऱ्यांच्या मदतीने तत्कालीन परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली. त्यांनी संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांचे मंचकारोहण केले व त्यांना रायगडावरून सुरक्षितरीत्या बाहेर जाण्यास सांगितले. येसूबाई या स्वतः रायगड लढवत होत्या. स्वराज्य अबाधित राहावे याच एकमेव हेतूने छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून बाहेर पडले. दक्षिणेमध्ये अर्थात तमिळनाडूमध्ये असणारा जिंजीचा किल्ला हा सर्वात सुरक्षित किल्ला मराठी सरदारांना वाटत होता. त्याच किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी जावे, असे सर्वानुमते ठरले. रायगडावरून निघाल्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या काही निवडक विश्वासू सरदारांसह प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेमध्ये उतरले व त्यांनी प्रदीर्घ प्रवासानंतर जिंजीचा किल्ला गाठला. मुघलांनी त्यांचा पाठलाग सुरु ठेवला होता. पण, ते त्यांच्या तावडीत कधीच सापडले नाहीत. अशा रीतीने पुन्हा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचा छत्रपती शत्रूच्या तावडीतून सुखरूप बाहेर पडला होता. त्यानंतरच्या काळामध्ये मराठी स्वराज्य हळूहळू विस्तारत गेले. महाराष्ट्राच्या मातीमध्येच औरंगजेबाचा मृत्यू झाला. परंतु मराठी स्वराज्याची पताका काही खाली आली नाही.
त्यांच्या या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा 'राजाराम चरित्रम्' हा ग्रंथ केशव पंडित यांनी संस्कृतमध्ये लिहिला होता. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारामध्ये केशव कवी अर्थात केशव पंडित यांना राजाश्रय होता. शिवकालातील समकालीन असणाऱ्या दुर्मिळ ग्रंथांपैकी केशव पंडित कृत 'राजाराम चरित्रम्' हा अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथ आहे. म्हणूनच तत्कालीन इतिहास बारकाईने समजून घेण्यासाठी त्याचे अध्ययन व अभ्यास महत्त्वाचा ठरतो. याच संस्कृत ग्रंथाचे इतिहासाचे भिष्माचार्य वा. सी. बेंद्रे यांनी मराठी व इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. म्हणूनच हा ग्रंथ आजच्या इतिहास संशोधक व अभ्यासकांसाठी एक बहुमूल्य ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये काव्याचे पाच सर्ग असून सुमारे २७५ श्लोक आहेत. शिवकालीन इतिहास तसेच महाराष्ट्राचा एकंदर इतिहास अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक उत्तम मार्गदर्शक ठरेल, असाच आहे.

- तुषार भ. कुटे

अमेझॉन लिंक: https://amzn.in/d/cDkMpYb

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com