Saturday, March 8, 2025

मराठी दौलतीचे नारी शिल्प

जागतिक महिला दिन विशेष

मराठेशाहीच्या चारशे वर्षांच्या इतिहासामध्ये पुरुषांबरोबरच स्त्रियांनीही पराक्रम गाजवले आहेत. अनेक प्रसंगी मराठी भूमितील महिला दीपस्तंभ म्हणून उभ्या ठाकलेल्या आहेत. कधी मसलतीच्या मैदानावर तर कधी युद्धाच्या रणांगणावर त्यांनी आपल्या पाऊलखुणा उमटविलेल्या आहेत. अशा मराठी भूमितील पराक्रमी स्त्रियांची ओळख करून देणारे हे पुस्तक “मराठी दौलतीचे नारी शिल्प”.
आपल्या रोमांचकारी आणि स्फूर्तीदायी इतिहासामध्ये अनेक स्त्रियांनी आपले नाव अजरामर केले. त्याची सुरुवात होते स्वराज्यजननी राजमाता जिजाबाई यांच्यापासून. शिवाजी महाराजांची जडणघडण करण्यामध्ये जिजाऊ साहेबांचा सर्वात मोठा वाटा होता. त्यांच्याच शिकवणीतून शिवरायांनी स्वराज्य घडविले, रयतेचे राज्य आणले आणि मराठा साम्राज्याची उभारणी केली. चहूबाजूंनी उभ्या ठाकलेल्या चार पादशाह्यांपासून स्वराज्य उभे झाले. याचे श्रेय राजमाता जिजाऊंना जाते. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली पत्नी सईबाई आणि मोठी सून अथवा छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांनी देखील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अढळस्थान प्राप्त केलेले आहे. याशिवाय छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच पेशवाईच्या कालखंडामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटविणाऱ्या दर्याबाई, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या सर्वांच्या कार्यकर्तृत्वाची इत्यंभूत माहिती या पुस्तकाद्वारे आपल्याला होते.
एकंदरीत पुस्तक वाचताना तीन स्त्रियांचा जीवन प्रवास हा अतिशय प्रेरणादायी वाटतो. त्यातील पहिल्या राजमाता जिजाबाई, दुसऱ्या महाराणी येसूबाई आणि तिसऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. यांच्याशिवाय मराठी मातीचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही, अशी भावना मनात तयार होते. महाराणी येसूबाई यांनी हिंदवी स्वराज्य विस्तार होत असतानाच्या कालखंडातील बहुतांश मोठ्या घटना अनुभवलेल्या आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांच्या त्या साक्षीदार आहेत. शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना भक्कमपणे साथ देणाऱ्या, शंभूराजांच्या अनुपस्थितीमध्ये स्वराज्याचा कारभार हाकणाऱ्या, आपल्याच माणसांनी शंभूराजांना औरंगजेबाकडे पकडून दिल्यानंतर परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाणाऱ्या आणि योग्य वेळी हिंदवी स्वराज्य नेस्तनाबूत होण्यापासून वाचविणाऱ्या, स्वराज्यासाठी जवळपास ३० वर्षे शत्रूच्या तावडीत घालविणाऱ्या, शाहू महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत तेवत ठेवणाऱ्या खंबीर पराक्रमी येसूबाई या पुस्तकातून आपल्याला भेटतात. कधी कधी असा देखील वाटतं की महाराणी येसूबाईंनी आपल्या आत्मचरित्र लिहिलं असतं तर इतिहासातील किती घटनांची उकल आपल्याला होऊ शकली असती!
मराठेशाहीच्या इतिहासातील आणखी एक पराक्रमी स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर. एका स्त्रीने राज्यकारभार हाती घेतल्यानंतर काय होऊ शकते? याचे उत्तम उदाहरण अहिल्यादेवींनी घालून दिले. मल्हारराव होळकरांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या अहिल्याबाई यांनी सातत्याने विविध दु:खे पचवली. परंतु त्यामध्ये रयतेची आबाळ होऊ दिली नाही. एक आदर्श प्रशासक म्हणून त्या इतिहासामध्ये अजरावर झाल्या. आजही त्यांच्या कार्याच्या पाऊलखुणा आपल्याला भारतभर पाहता येतात. यातूनच त्यांच्या कार्याची प्रचिती देखील येते.
मराठी मातीमध्ये घडलेल्या या आदर्श स्त्रियांची छोटीखानी संकलित चरित्रे आपल्या गौरवशाली इतिहासाची प्रचिती देतातच तसेच भविष्यासाठी प्रेरणादायी देखील ठरतात.

— तुषार भ. कुटे

#मराठी #मराठा #महाराष्ट्र #इतिहास #पुस्तक #परीक्षण #महिला_दिवस


No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com