Thursday, March 6, 2025

मिलरचे शतक

कालच्या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या शेवटच्या चेंडूवर आलेलं शतक अधिक लक्षवेधी ठरलं. शेवटच्या तीन षटकांमध्ये ९३ धावांची गरज असताना डेविड मिलर ५२ धावांवर खेळत होता. त्यानंतर त्यांनी जी संस्मरणीय फटकेबाजी केली त्याला तोड नाही. १८ चेंडूंमध्ये ४८ धावा काढून अखेरच्या चेंडूवर त्याने शतक पूर्ण केलं. फलंदाजीमध्ये मिलरच्याच क्रमांकावर एकेकाळी येणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या लान्स क्लूजनरची आठवण झाली. आपली हातोडारुपी बॅट घेऊन क्लूजनर थाटाने मैदानात उतरायचा. आणि बिनधास्तपणे मैदानाच्या चहुबाजूंना फटके मारायचा. दक्षिण आफ्रिकेला आपल्या फलंदाजीच्या बळावर त्याने आजवर बरेच सामने जिंकून दिलेले आहेत. मिलर हा देखील क्लूजनरच्याच वंशावळीतला. परंतु तो मैदानावर आला तोपर्यंत आफ्रिकेच्या हातातून सामना निसटून गेला होता. शेवटच्या तीन षटकांतील त्याची फटकेबाजी कोणत्याही क्रिकेट प्रेमीला निश्चितच आवडली असणार. शेवटचा चेंडू बाकी असताना मिलर ९८ धावांवर खेळत होता. शेवटचा फटका मारला आणि त्याने दोन धावांसाठी पळायला सुरुवात केली. तेव्हाच न्युझीलँडचे एकंदरीत क्षेत्ररक्षण पाहता त्यांनी चक्क मिलरचे शतक 'होऊ' दिले, हे विशेष! याला देखील 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' म्हणायला काय हरकत आहे?


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com