Friday, April 4, 2025

मशीन इंटेलिजन्सच्या दिशेने

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे स्तरानुसार अर्थात क्षमतापातळीनुसार तीन प्रकार पडतात. आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स, आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स!
आज आपण पहिल्याच पातळीमध्ये आहोत. ज्यामध्ये मशीन लर्निंगचा वापर करून विविध एआयआधारित उत्पादने तयार केली जातात. ज्यामध्ये आधीच्या माहितीचा वापर करून अल्गोरिदमला प्रशिक्षित केले जाते आणि मानवी कार्य करून घेतली जातात. अर्थात याद्वारे हुबेहूब मानवी क्षमता असलेल्या संगणक अजूनही बनवता आलेला नाही.
‘आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स’ ही एआयची दुसरी पातळी. ज्यामध्ये बनवलेल्या संगणक हुबेहूब मानवी कामे करू शकेल. खरंतर इथपर्यंत आपण अजूनही पोहोचलेलो नाही. परंतु याकरिता मशीन लर्निंगचा पुढचा स्तर अर्थात मशीन इंटेलिजन्स तयार होणे गरजेचे आहे.
तिसऱ्या स्तराला ‘आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स’ म्हणतात. ज्यामध्ये संगणकीय अल्गोरिदम मानवी क्षमतेपेक्षा वरचढ कामगिरी करू शकतील. किंबहुना मानवाच्या प्रत्येक कामाला पर्याय उभा करू शकतील. अनेक विज्ञान-रंजन चित्रपटांमध्ये अशा प्रकारचे रोबोट्स आपल्याला पाहता येतात. परंतु इथवर पोहोचण्यासाठी अजूनही काही दशकांचा कालावधी आहे!
आज वापरण्यात येणारे सर्वात मोठे एआय उत्पादन म्हणजे चॅटजीपीटी होय. जगभरातील करोडो लोकांकडून याचा वापर केला जातो. ओपन एआय या कंपनीने बनवलेले हे चॅट एप्लीकेशन जगभरात सर्वांकडून वापरले जाते. सध्या त्याची चौथी आवृत्ती वापरण्याकरता उपलब्ध आहे. एआय जगतामध्ये आलेल्या वृत्तानुसार ओपन एआयची ४.५ ही आवृत्ती प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे चॅटजीपीटीच्या या नवीन आवृत्तीने उच्च पातळीवर ट्युरिंग टेस्टदेखील उत्तीर्ण केल्याचे समजते. सुमारे ८० वर्षांपूर्वी एआयचा जनक अॅलन ट्युरींग याने या चाचणीची निर्मिती केली होती. याद्वारे संगणक आपण संगणकाशी संभाषण करत आहोत की मानवाशी? हे ओळखून दाखवतो. कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या अभ्यासामध्ये चॅटजीपीटी ४.५ ने तब्बल ७३ टक्के वेळा ट्युरिंग टेस्ट उत्तीर्ण केल्याची समजते! म्हणजे चॅटजीपीटीने केलेले संभाषण हे मानवानेच केलेले संभाषण आहे, असं दाखवलेलं दिसतं! अर्थात या उत्पादनाद्वारे आपण हळूहळू मशीन लर्निंगला मागे टाकत ‘मशीन इंटेलिजन्स’च्या दिशेने चाललो असल्याचे दिसते. अर्थात आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स आता आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्सकडे जाताना दिसत आहे. खरंतर हा प्रवास वेगाने होताना दिसतो. आज जवळपास प्रत्येक क्षेत्रामध्ये एआयचा वापर वाढत आहे. खरोखर मानवच करू शकतो, अशी कामे देखील एआयद्वारे होत आहेत. मानवाची क्षमता आजही त्याच जागेवर आहे, परंतु मशीन मात्र उत्क्रांत होताना दिसते आहे! हे प्रगतीचे लक्षण की धोक्याची घंटा? या प्रश्नाचे उत्तर मात्र शोधावे लागेल.

---- तुषार भ. कुटे