Sunday, April 6, 2025

असुर

समाजमाध्यमांवर विविध पानांवर असुर या वेबसिरीजबद्दल माहिती ऐकली होती. त्यातूनच जिओ सिनेमावर ही वेब सिरीज पाहायला सुरुवात केली.
प्राचीन काळापासून आजतागायत सामाजिक परिस्थिती बदलत आली. परंतु अध्यात्म आणि देव ही संकल्पना अजूनही तशीच आहे. अजूनही आपल्याकडे कल्की जन्माला येईल, असे अनेकांना वाटते. किंबहुना मी स्वतःच कल्की आहे, असे देखील काहीजण सांगू लागलेले आहेत. यातीलच एकाची गोष्ट असुरमध्ये पाहायला मिळते.
तंत्रज्ञान बदलतय परंतु त्याचा जर गैरवापर केला गेला तर काय होऊ शकतं? याची प्रचिती असुर पाहिल्यानंतर येते. फॉरेन्सिक विभागामध्ये काम करणाऱ्या अभियंत्यांची ही गोष्ट आहे. त्यांना एका सिरीयल किलरला शोधायचे आहे. त्यासाठीचे पुरावे ते गोळा करतात. परंतु मारेकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण तो सातत्याने त्यांच्या अनेक पावले पुढे चालतो…. भविष्याचा विचार करतो… काळालाही त्याने मागे टाकले आहे. अशा गुन्हेगाराला पकडताना पूर्ण यंत्रणेचीच भयंकर दमछाक होते. या वेबसिरीजचा पहिला सीजन एका निराशाजनक शेवटाने संपतो.
दुसऱ्या सीझनमध्ये देखील तीच निराशा कायम चालू राहते. काळाच्या पुढे पळणारा गुन्हेगार तंत्रज्ञानाचा अतिशय हुशारीने वापर करत जात असतो. त्याला पकडताना अनेकांचे जीवही जातात. त्याने पोलीस यंत्रणेतीलच अनेकांना फितवले देखील असते. यातूनच निरनिराळी सत्ये, विश्वास बाहेर येतात. आणि शेवटी जाताना गेली कित्येक भागांमध्ये असलेली निराशा आशेच्या दिशेने प्रवास करायला लागते. परंतु आज विकसित होणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान जर चुकीच्या पद्धतीने वापरायचे ठरवले तर काय होऊ शकते? हे या वेबसिरीज मधून प्रकर्षाने जाणवते!

— तुषार भ. कुटे

#मराठी #वेबसिरीज


 

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com